नियतीने खेळला असाही खेळ वडीलांना अखेरची श्रद्धांजली वाहत, कल्याणी वर आली दहावीचा पेपर देण्याची वेळ.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०३/२०२३
आज इयत्ता दहावीच्या वार्षिक परीक्षेचा मराठी विषयाचा पहिला पेपर सगळीकडे विद्यार्थी मोठ्या आनंदाने परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी उत्सुक दिसून येते होते. मात्र भडगाव तालुक्यातील बांबरुड येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थीनीच्या वडीलाचे आकस्मिक निधन झाल्याने कल्याणीच्या आनंदावर विरजण पडले होते. एका बाजूला वडीलांचे पार्थिव घरात तर दुसरीकडे दहावीच्या परीक्षेत पेपर देणे गरजेचे होते परंतु कल्याणीने घाबरुन न जाता वडीलांच्या पार्थिवाला खांदा देऊन शेवटचा निरोप देत दुःखी अंतकरणाने परीक्षा केंद्रावर जाऊन मराठी विषयाचा पेपर देण्याची वेळ आली.
स्व. कैलास जाधव.
याबाबत सविस्तर वृत्त असे की भडगाव तालुक्यातील बांबरुड बुद्रुक येथे कैलास भोजू जाधव हे कष्टकरी शेतकरी कुटुंब कैलास जाधव यांना एक मुलगा व एक मुलगी आपल आयुष्य असच कष्ट करण्यात चालल आहे परंतु मी माझ्या मुलामुलींना कोणत्याही परिस्थितीत चांगले शिक्षण देऊन चांगली नोकरी मिळवून देईल हे स्वप्न उराशी बाळगून कैलास जाधव हे शेतात काम करुन आल्यानंतर दररोज रात्री मुलांकडून अभ्यास करुन घेत असत.
नियमितपणे कैलास जाधव हे दिनांक ०१ मार्च २०२३ बुधवारी शेतातून घरी आले संध्याकाळी जेवण झाल्यावर त्यांच्या लक्षात आले की उद्या आपल्या कल्याणीचा दहावीचा पहिला पेपर म्हणून त्यांनी कल्याणीला बोलावून घेत जवळ बसवून परीक्षा केंद्रावरचे नियम समजून सांगत मराठी विषयावर सविस्तर माहिती देत पेपर कसा सोडवायचा म्हणून समजून सांगितले व सकाळी उठून पुन्हा थोडेफार वाचन कर सकाळचा अभ्यास लक्षात रहातो व पेपर देतांना कॉपी करायची नाही अशी सुचना करत आपली मुलगी चांगले मार्क मिळवून उत्तीर्ण झाली तर पुढे काय करायचे ही स्वप्ने रंगवत सकाळी लवकर उठायचे आहे म्हणून रात्री बारा वाजता झोपी गेले.
परंतु नियतीने वेगळाच डाव साधला दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक ०२ मार्च २०२३ गुरुवार रोजी कैलास जाधव हे नियमितपणे सकाळी उठले परंतु त्यांच्या छातीत तीव्र कळ आल्यावर ते जागीच बसले घरच्यांना आवाज देऊन घेत छातीत खुपच त्रास होतोय असे सांगितले लगेचच धावपळ सुरु झाली व पाचोरा येथे दवाखान्यात नेण्यासाठी वाहन शोधत असतांनाच नियतीने घाला घातला व कैलास पाटील यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
वडिलांनी सांगितल्याप्रमाणी एका बाजूला कल्याणी सकाळी अभ्यास करते तर दुसरीकडे वडीलांच्या छातीत कळ येते उपचार मिळण्याआधीच काही क्षणात वडील जगाचा निरोप घेतात एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं तरीही कल्याणीने धीर सोडला नाही बाबा मी चांगले मार्क मिळवून तुम्हाला उत्तीर्ण होऊन दाखवेल ही वचनपूर्ती पूर्ण करण्यासाठी कल्याणीने काळजावर दगड ठेवून कुटुंबाला धीर देत वडीलांच्या अंत्यविधीत सामील होऊन वडीलांच्या पार्थिवाला खांदा लावून वडीलाचे शेवटचे अतींम दर्शन व आशिर्वाद घेऊन परिक्षेला जाण्यासाठी तयारी केली.
डोळ्यात वडिलांना दिलेला शब्द व त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी डोळ्यात अश्रूंचा पूर घेऊन जेव्हा कल्याणी घरून निघाली तेव्हा मात्र रस्त्यावरुन जातांना बांबरुड गावाचे ग्रामस्थ, माता, भगिनी व लहानथोर मंडळींच्या डोळ्यात नकळत अश्रू दाटून आले होते. कल्याणी लगेचच परिक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी निघाली व लोहटार येथील परिक्षा केंद्रावर जाऊन दुःखी अंतकरणाने मोठ्या हिमतीने दहावीच्या मराठी विषयाचा पेपर दिला.
(नियतीने खेळला असाही खेळ वडीलांना अखेरची श्रद्धांजली वाहत, कल्याणी वर आली दहावीचा पेपर देण्याची वेळ.)
कल्याणीला पेपर लिहितांना आपल्या वडिलांनी आपल्याला शिकवण्यासाठी केलेली धडपड व आयुष्यातील अनेक प्रसंग डोळ्यासमोर येत होते. तर ठरवले वेळेच्या आत प्रश्नपत्रिका सोडवणे महत्वाचे होते. म्हणून कल्याणीने एकजीव होऊन पेपर लिहिला पेपर लिहितांना तिच्या डोळ्यात नक्कीच अश्रू अनावर झाले असतील व ते अश्रू त्या उत्तरपत्रिकेवर पडले असतील म्हणून कल्याणीने केलेल्या मेहनतीतुन या परिक्षेत चांगले मार्क्स मिळून ती उत्तीर्ण झाली तर नक्कीच तिच्या अश्रूंची फुले होतील हे मात्र निश्चित.