पहूर येथील सराफी व्यापाऱ्याचा संशस्यास्पद मृत्यू, घातपात की अपघात पोलिसांसमोर मोठे आव्हान.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०८/२०२२
जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथील सोन्या, चांदीचे व्यापारी पूनमचंद गुलाबचंद वर्मा वय (४२) लोहारा ते पहूर रस्त्यावरील गोगडी नदीच्या पुलाजवळ रक्तबंबाळ अवस्थेत मयत स्थितीत आढळून आल्यामुळे पहूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पहूर येथील पूनमचंद गुलाबचंद वर्मा वय (४२) वर्षे यांचे पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे मेघराज ज्वेलर्स या नावाने सोन्या, चांदीचे सराफी दुकान आहे. या व्यवसायानिमित्त ते दररोज पहूर ते लोहारा आपल्या दुचाकीवरून येत, जात होते. आजही ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून लोहारा येथून सायंकाळी अंदाजे सात वाजेच्या सुमारास पहूर कडे जात असतांनाच लोहारा ते पहूर दरम्यान असलेल्या गोगडी नदीच्या पुलाजवळ रक्तबंबाळ व मृत अवस्थेत आढळून आले असून घटनेत मयताची बॅग व मोबाईल हे जागेवर मिळुन आले नसल्याने हा संशयास्पद मृत्यू म्हणजे अपघात आहे की घातपात याबद्दल जनतेतून उलटसुलट चर्चा ऐकायला येत आहे.
ही घटना लक्षात येताच पहूर, पाळधी, लोहारा, नाचनखेडा व परिसरात भितीच वातावरण निर्माण झाले आहे. मयत पूनमचंद गुलाबचंद वर्मा हे मनमिळाऊ स्वभावाचे व आपला उद्योग भला व आपण भले असा सोज्वळ माणूस म्हणून त्यांची ओळख होती. मग अश्या शांत व सुस्वभावी व्यक्तीचा असा दुर्दैवी व संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
मयत पूनमचंद गुलाबचंद वर्मा यांच्या पाश्चात्य आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोडे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.