अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द, टीईटी घोटाळ्याचे लोण सिल्लोडपर्यंत.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०८/२०२२
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळा प्रकरणाचे लोण आता थेट सिल्लोडपर्यंत पोहचले असल्याचे समोर आले असून माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची टीईटी प्रमाणपत्रे रद्द झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी समांतर चौकशी करीत आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी प्रमाणपत्र परीक्षेत मोठा गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. आरोग्य भरती प्रकरणाचा पुणे पोलीस तपास करीत असतानाच हा शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) चा घोटाळा उघडकीस आला आहे. या घोटाळ्यात परीक्षा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि परीक्षा घेणाऱया खासगी कंपन्यांचे संचालक आणि परीक्षा देणारे उमेदवार यांची साखळी असल्याचे स्पष्ट झाले असून त्यापैकी काही जणांना अटकही करण्यात आलेली आहे.
परीक्षा परिषदेने परीक्षेत गैरप्रकार केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात सात हजार ८७४ उमेदवारांचा समावेश असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. गैरप्रकारात अडकलेल्या संबंधित उमेदवारांची प्रमाणपत्रे परिषदेने रद्द केली असून ज्यांची प्रमाणपत्रे रद्द केली त्यांना पुढील टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरूपी प्रतिबंध करण्यात आलेला आहे.
या यादीमध्ये संभाजीनगर जिल्हय़ातील काही उमेदवारांचा समावेश असून यादी जाहीर झाल्यानंतर गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची नावेही समोर आलेली आहेत. या टीईटी घोटाळ्यात सिल्लोडचे आमदार, माजी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख या दोन मुलींचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये सात शैक्षणिक संस्था असून या संस्थांमध्येच या मुलीही सेवारत असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या संस्थांच्या प्रशासकीय अधिकाऱयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संबंधित अधिकारी हे हज यात्रेसाठी गेल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.