लोहारा येथे दुचाकी अपघात दोन गंभीर जखमी, दवाखान्यात एकच डॉक्टरची नियुक्ती असल्याने उपचारासाठी विलंब .

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०७/२०२२
पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील दुरक्षेत्र पोलीस चौकी समोर आज रात्री ९/४० ते दहा वाजेच्या सुमारास दुचाकीचा अपघात होऊन या अपघातात दोन जण जबर जखमी झाले आहेत. अपघात होताच लोहारा येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले असता त्याठिकाणी डॉक्टर हजर नसल्याने दवाखान्यात हजर असलेल्या आरोग्यसेविका व मदतनीस यांनी तातडीने औषधोपचार केले व दिवसभर दवाखान्यात कामकाज करुन नुकतेच जेवायला गेलेल्या डॉक्टरांना भ्रमणध्वनीवर अपघाताची माहिती दिली
ही माहिती मिळताच नव्यानेच नियुक्त करण्यात आलेले डॉक्टर शुभम पवार यांनी धावपळ करत प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन अपघातग्रस्त जखमींवर उपचार केले. यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. परंतु या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असल्याने तसेच आधिच्या नियुक्त डॉक्टर चित्रलेखा पाटील ह्या रजेवर असल्याने एकच डॉक्टर कामकाज पहात आहेत. यामुळे डॉक्टरांची धावपळ होत आहे. तसेच उपचारासाठी विलंब होत असल्याने या दवाखान्यात त्वरित दोन निवासी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.