वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रामभरोसे, भाविकांच्या पदरी निराशा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०७/२०२२
वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु हे वैद्यकीय अधिकारी नियमितपणे आरोग्य केंद्रात उपस्थित नसतात अशी ओरड मागिल काही महिन्यांपासून सर्वसामान्य जनतेतून केली जात आहे.
विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथरावजी शिंदे यांनी स्वतंत्रपणे आदेश काढून आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना विशेष सूचना देत देवयानी आषाढी एकादशीला महाराष्ट्रातील अत्यावश्यक असलेल्या विभागातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या कर्तव्याच्या मुख्यालयात हजर राहून जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्यासाठी सुचत करण्यात आले आहे. यात महत्वाचे म्हणजे पोलीस व वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना विशेष सूचना देऊन मुख्यालयात थांबून येणाऱ्या, जाणाऱ्या भाविकांसाठी योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात असे आदेश देण्यात आले आहेत.
असे असले तरी पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकुण चार वैद्यकीय अधिकारी कार्यरत असतांनाच आज देवयानी आषाढी एकादशीच्या दिवशी या आरोग्य केंद्रात फक्त आरोग्य सेवक, आरोग्य सेविकाच हजर असल्याने पायी दिंडीत प्रवास करत भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविक, भक्तांना अनेक अडीअडचणीला सामोरे जावे लागले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की वरखेडी येथून जवळच असलेले पिंपळगाव हरेश्र्वर या गावाची ओळख महाराष्ट्रात प्रती पंढरपूर म्हणून आहे. याच पिंपळगाव हरेश्र्वर येथे श्री. गोविंद महाराज मंदिर, श्री. विठ्ठल महाराज मंदिर व महादेव मंदिर असल्याने देवयानी आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातील हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येतात. या येणाऱ्या भाविक, भक्तांपैकी पन्नास टक्के भाविक, भक्त अनवाणी पायाने पायी दिंडीत चालत येतात व दर्शन घेऊन परत जातात.
याच प्रवासादरम्यान या पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना पायी चालतांना रस्त्याने पायाला फोड येणे, ठेच लागते, पायात काटा बोचणे, सतत पायी चालून, चालून हातपाय दुखणे, पायात गोळे येणे, गावागावांतील वेगवेगळ्या ठिकाणचे पाणी पिण्यात येत असल्याने पचनक्रियेत बिघाड होणे, यात पोट दुखणे, उलटी, मळमळ, ऍसिडिटी (चयापचय) क्रियेत बिघाड होणे अश्या आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात व यावर उपचारासाठी वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी हे भाविक, भक्त रस्त्यावर असलेल्या दवाखान्यात जाऊन औषधोपचार करुन घेतात. व याकरिता शासन, प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असते.
परंतु आज दिनांक १० जूलै २०२२ रविवार रोजी वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात चार वैद्यकीय अधिकारी कार्यरत असतांनाही या पैकी एकही वैद्यकीय हजर नसल्याने पिंपळगाव हरेश्वर येथे पायी दिंडीत जाणाऱ्या भाविकांची उपचारासाठी तारांबळ उडाली होती. म्हणून काही गरजू भाविक, भक्तांवर या दवाखान्यात हजर असलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रथमोपचार केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ही भाविकांची गैरसोय पाहून वरखेडी येथील सुज्ञ नागरिक व सर्वसामान्य जनतेतून आरोग्य विभागाच्या या मनमानी हवं भोंगळ कारभाराबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. ही परिस्थिती पाहून वरखेडी येथील काही खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांनी गरजू रुग्णांची तपासणी करुन मोफत उपचार केल्यामुळे काही भाविक, भक्तांची होणाऱ्या त्रासापासून सुटका झाली व पुढील प्रवास आरामदायी होण्यासाठी मदत मिळली असेही समजते.
परंतु वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन महिला व दोन पुरुष अशा चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून हे चारही वैद्यकीय अधिकारी मुख्यालयात कायमस्वरूपी हजर रहात नसल्याने पंचक्रोशीतील गावागावांतील गरजू रुग्णांची गैरसोय होत आहे.
विशेष~ (वरखेडी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना लाल रंगाचे वावडे, दिनदर्शिकेचे (कॅलेंडर)चे पानावर लाल अक्षरात दिनांक असली म्हणजे आमचे आमच्या व्यवसायाशी तसेच ठरवून व नेमून दिलेल्या कामकाजासाठी आमचं काहीच देणंघेणं नसल्याचा ठाम निर्णय घेऊन येथील वैद्यकीय अधिकारी वागत असल्याचे निदर्शनास येत आहे.