भरारी पथकाने केले काय, खाली डोकं वरती पाय. बियाणे विक्रीच्या बाजारात पंगा व कबड्डी, कब्बडीच्या खेळात, शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०६/२०२२
सद्यस्थितीत पावसाळा सुरु झाला असून शेतकरी वर्ग बि, बियाणे, खते व कीडनाशके खरेदी करण्यासाठी सरसावले आहेत. परंतु नेमका शेतकऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेण्यासाठी टपुन बसलेले कृषी केंद्राचे मालक व संचालक हे बि, बियाणे व खतांची चढ्या भावाने खुलेआम विक्री करुन यात कब्बडी व पंगा या कापूस बियाणांची विक्री पाचोरा तालुक्यासह सगळीकडे चढ्या भावाने विक्री करुन शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक करत आहेत.
या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर स्वतंत्र कृषी विभाग कार्यान्वित करण्यात आला असून जिल्हा व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आपापल्या परिसरातील कृषी केंद्राची माहिती काढून असे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करुन शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लुबाडणूक थांबवण्यासाठी तसे काही आढळून आल्यास कारवाई करण्यासाठी भरारी पथकांची निर्मिती केली आहे. परंतु तरीही आजच्या परिस्थितीत सगळीकडे बि, बियाणे व खतांची चढ्या भावाने खुलेआम विक्री सुरुच असल्याचे दिसून येते आहे.
(भरारी पथकाने केले काय ? खाली डोकं वरती पाय.)
*************************************
बि, बियाणे व खतांची चढ्या भावाने विक्री होऊ नये म्हणून शासनाच्या आदेशानुसार सगळीकडे भरारी पथके नेमुन हा गैरप्रकार रोखण्यासाठी सांगितले गेले होते. हा आदेश निघाल्यावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी भरारी पथकाकडून जिल्हा व तालुकास्तरावर पथके पाठवून एक जून अगोदर कुठे कापूस बियाणांची विक्री होत आहे का ? आता कुठे चढ्या भावाने विक्री होत आहे का ? ही सत्य परिस्थिती जाणून घेत असा गैरप्रकार आढळल्यास कारवाई करण्यासाठी आदेश दिले होते.
या आदेशानुसार जिल्हा व तालुकास्तरावर कषी विभागाच्या भरारी पथकाने कृषी केंद्रांना भेटी देत चौकशीचा आव आणून आपापल्या मोबाईलमध्ये फोटो काढून सोशल मीडियावर फोटो पाठवून भरारी पथकाकडून शासन आदेशानुसार कामकाज सुरु असल्याचा भपका (बडेजाव) दाखवून स्वताची पाठ थोपटून घेतली होती असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
कारण बाजारात शासनमान्य एकुण सत्तर कंपनीकडून कापूस बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व प्रकारच्या कापूस बियाणांची विक्री करतांना फक्त आणि फक्त ८१०/०० रुपये प्रति बॅग (थैली) या भावाने विक्री करण्यात यावी असे सक्त आदेश दिले होते. तरीही बियाणे विक्री सुरु झाल्यापासून कृषी केंद्राचे मालक हे बियाणे उपलब्ध नाहीत तुम्हाला पाहिजे असल्यास आम्ही कापूस बियाणे उपलब्ध करून देऊ मात्र त्याकरिता तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील असे सांगून अडवणूक करून शासनाच्या आदेशानुसार ४५० ग्रॉम वजन असलेल्या कापूस बियाणाच्या बॅगची किंमत ८१०/०० रुपये असल्यावर सुध्दा (गरजवंताला अक्कल थोडी) अशी शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून कब्बडी व पंगा नावाचे वाण ८१०/०० रुपया एवजी ११००/००, १२५०/०० ते १४००/०० रुपये घेऊन कापूस बियाणांची विक्री करत आहेत. मात्र कापूस बियाण्याचे बिल देतांना बिलावर शासनमान्य दर ८१०/०० रुपये रक्कम लिहून बिल दिले जात असल्याचे शेतकरी सांगतात.
असे असले तरीही आज बरेचसे शेतकरीबांधव कापूस बियाणांची खरेदी करण्यासाठी बाजारात गेल्यावर त्यांना इच्छीत असलेले वाण कब्बडी व पंगा हे कापूस बियाणे एकाबाजूला मीळत नाही परंतु दुसरीकडे हेच कब्बडी व पंगा कापूस बियाणांची चढ्या भावाने खुलेआम विक्री सुरुच आहे. मग (कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले काय खाली डोकं वरती पाय) असे म्हटले तर ते आजची परिस्थिती पाहून वावगे ठरणार नाही.
म्हणून आतातरी लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारुन कापूस बियाणांची विक्री शासनमान्य दरात करण्यासाठी सुचना द्याव्यात कारण अजूनही अल्पभूधारक व सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी इकडून, तिकडून पैशांचा जुगाड करुन कमरेला पैसा ठेऊन पावसाची वाट पहात आहे व पाऊस पडल्यानंतर आपण कापूस बियाणांची खरेदी करुन लागवड करु अश्या आशेवर बसला आहे. अश्याच सर्वसामान्य शेतकऱ्यांना तरी शासनमान्य दरात कापूस बियाणे मिळावे अशी मागणी केली जात आहे. तसेच चढ्या भावाने बि, बियाणे व खतांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्राची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
अजून महत्वाची बाब म्हणजे शासनाने एक जून पर्यंत बि, बियाणे विक्री करु नये असा आदेश काढून या आदेशाची अंमलबजावणी व्हावी म्हणून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना भरारी पथके तयार करुन या पथकाकडून अशी अनाधिकृत बियाणे विक्री थांबवण्यासाठी आदेश दिले होते. तरीही चुपके, चुपके कापूस बियाणांची विक्री झाली व त्याचा जिवंत पुरावा म्हणजे एका बाजूला पाऊस येत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे व दुसऱ्या बाजूला ज्यांनी नियम पाळुन ठिंबक संचावर कापूस बियाणांची लागवड केली अश्या शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस पिकाची वाढ पाच ते सहा पानावर आहे. (तर) दुसरीकडे पैशाच्या जोरावर शासनाचे नियम धाब्यावर बसवून कापूस बियाणांची खरेदी करुन कापसाची लागवड केली आहे त्यांच्या कापूस पिकाची वाढ यापेक्षा जास्त झालेली दिसून येत आहे.