ग्रामविकास मंडळाकडून सार्वजनिक न्यास नोंदणी अधीक्षकांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली.
![](https://satyajeetnews.com/wp-content/uploads/2024/03/featured-image-1.jpg)
दिनांक~२७/०३/२०२२
कालच आपण पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास मंडळाचे सभासद मा.श्री. किशोर भिकनराव गरुड यांनी ग्रामविकास मंडळाच्या मनमानी कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत ग्रामविकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात बोगस व वशिलेबाजी करुन शिक्षक भरती करण्यात आली असल्याची माहिती कागदपत्रांच्या पुराव्यानिशी सत्यजित न्यूजकडे सादर करत झालेल्या गैरप्रकाराची चौकशी होऊन न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.
सोबतच ग्रामविकास मंडळाचा कार्यकाळ मागील दोन वर्षांपूर्वी संपलेला असल्यावरही सत्ताधारी संचालक मंडळ व चेअरमन हे मनमानी करुन सत्ता आपल्याच हाती रहावी म्हणून कार्यकाळ संपलेला असल्यावरही नियमाप्रमाणे निवडणूक घेत नसल्याने नाराजी व्यक्त करत त्यांनी निवडणूका वेळेवर घेण्यात याव्यात याकरिता सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात अधिक्षक यांच्याकडे मागील वर्षी लेखी तक्रार करुन निवडणूक घेण्यात यावी अशी विनंती केली होती.
या तक्रारीची दखल घेत सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय जळगाव विभाग जळगावचे अधिक्षक यांनी दिनांक २० मार्च २०२१ मंगळवार रोजी रितसर पत्रव्यवहार करुन ग्रामविकास मंडळाला संस्थेच्या कार्यकारणीचा कार्यकाळ संपला असून संस्थेने केंद्रसरकार, राज्यसरकार तसेच लोकल ऑथिरीटी यांनी मिटींग घेण्याच्या संदर्भात जे काही निर्देश दिलेले आहेत. त्याचे पालन करून व संस्थेच्या घटनेनुसार आपल्या स्तरावर त्वरित निवडणूक प्रक्रिया राबवावी, असे सुचित केलेले आहे.
मात्र सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय जळगाव विभाग जळगावचे अधिक्षक यांनी दिनांक २० मार्च २०२१ मंगळवार रोजी पत्र दिलेले असून आज एक वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. तरीही ग्रामविकास मंडळाने या आदेशाचे पालन न करता या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचा आरोप ग्रामविकास मंडळाचे सदस्य मा.श्री. किशोर गरुड यांनी केला असून कायद्याची पायमल्ली करणाऱ्या संचालक मंडळावर कायदेशीर कारवाई होऊन त्वरित निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी केली आहे.
(न्याय न मिळाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असून लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असून न्यायालयात धाव घेणार असल्याचे मत मा.श्री. किशोर गरुड यांनी बोलून दाखवले)