पाचोरा येथील लाचखोर कृषी सहाय्यक जळगाव ए.सी.बी.च्या जाळ्यात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०३/२०२३
सबसीडीची रक्कम बँक खात्यात जमा करण्यासाठी पंधराशे रुपयांची लाच मागून ती स्वीकारणारा पाचोरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यक ललितकुमार विठ्ठल देवरे (रा.आनंद नगर, प्रतिभा फ्लोअर मि लजवळ, पाचोरा) यास जळगाव एसीबीच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी अटक केली. विशेष म्हणजे पाचोरा कृषी कार्यालयातच जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा हा सापळा यशस्वी झाल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
(कृषी कार्यालयातच स्वीकारली लाच)
पाचोरा तालुक्यातील भोजे येथील तक्रारदार यांनी त्यांच्या आईच्या नावे महाराष्ट्र कृषी विभागाची राज्य कृषी यांत्रिकीकरण (महा.डी.बी.टी.) योजनेंतर्गत शेती कामासाठी लागणारे बी.सी.एस. पॉवर ट्रिलर आठ एच.पी.चे मशीन घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला होता. हा अर्ज हा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून मंजुर झाल्याने बी.सी.एस. पॉवर ट्रिलर खरेदी करण्यात आले व या योजनेंतर्गत मिळणारी ८५०००/०० हजारांची सबसीडीची रक्कम अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केल्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे आरोपी ललितकुमार याने दिनांक २४ मार्च २०२२ गुरुवार रोजी मागितली होती.
तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर पडताळणी करण्यात आली. पाचोरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातच गुरुवारी सायंकाळी आरोपीला लाच घेताच पथकाने अटक केली.
(यांनी केला सापळा यशस्वी)
हा सापळा जळगाव ए.सी.बी.चे पोलिस उपअधीक्षक शशीकांत श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, ए.एस.आय. दिनेशसिंग पाटील, ए.एस.आय. सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, हवालदार शैला धनगर, पोलिस नाईक मनोज जोशी, पोलिस नाईक जनार्धन चौधरी, नाईक सुनील शिरसाठ, पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, पोलिस कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, पोलिस कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ यांच्या पथकाने यशस्वी केला.
सद्यस्थितीत पाचोरा तालुक्यात सगळीकडेच शासनाच्या योजना मिळवून घेण्यासाठी फिरणाऱ्या गरजूंना काही दलाल हेरतात व या योजना मिळवून देण्यासाठी संपर्क साधून विश्वासात घेऊन दलाली करत आहेत. यात विशेष म्हणजे बऱ्याचशा अधिकाऱ्यांनी आपपल्या कार्यालयात ओळखीचे पंटर पाळून ठेवले असून या पंटरव्दारे कोणत्याही योजना मिळवून देण्यासाठी मध्यस्थी करत पैसे उकळत असल्याचा प्रकार राजरोसपणे पहावयास व ऐकावयास मिळतो व गरजवंताला अक्कल थोडी या म्हणीप्रमाणे पैसे न दिल्यास ही मिळणारी योजना हातातून निघून जाईल का या भितीपोटी तसेच पैसे न दिल्यास संबंधीत अधिकारी फिरवा, फिरव करतात म्हणून गरजू लाभार्थी या देवण, घेवाणीला मजबूरीने सामोरे जातो. म्हणून लाच घेणाऱ्यांची हिंमत दिवसेंदिवस वाढत आहे.
याचे मुळ कारण म्हणजे ग्राम पातळी पासून तर पंचायत समिती सभापती, सदस्य, जिल्हापरिषदेचे पदाधिकारी, मा. आमदार या लोकप्रतिनिधींचा शासकीय कर्मच्याऱ्यांवर वचक राहिलेला नाही असे म्हटले तर हे वावगे ठरणार नाही. आता हा सापळा यशस्वी झाला याबद्दल खरेतर तक्रारदाराचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. म्हणून सगळ्यांनी कुठेही लाच देणार नाही असा संकल्प केल्याशिवाय हा भ्रष्टाचार थांबणार नाही. हे मात्र तेवढे खरे.