शेंदुर्णी ते सोयगाव रस्त्यावरील खड्डा बुजवण्यासाठी शेंदुर्णी येथे रस्ता रोको आंदोलन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०१/२०२२
जळगाव जिल्ह्यातील व जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी हे गाव प्रति पंढरपूर तसेच शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे मोठ्या लोकसंखेचे गाव असून जामनेर, पाचोरा व सोयगाव तालुक्याचा संगम येथेच घडतो या कारणांमुळे शेंदुर्णी गावात देवदर्शनासाठी, शिक्षणासाठी तसेच मोठी बाजारपेठ असल्याकारणाने दैनंदिन व्यवहारासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची आवक, जावक नेहमीच सुरु असते. परंतु अश्या या सुखसुविधा असलेल्या गावासाठी मात्र शेंदुर्णी ते सोयगाव रस्त्यावर असलेला खड्डा डोकेदुखी ठरत आहे.
कारण मागील नऊ महिन्यांपूर्वी जामनेर सार्वजनिक बांधकाम विभागाने शेंदुर्णी ते सोयगाव रस्त्यावर मोहम्मदिया शाळेजवळ असलेल्या मोरिचे व रस्त्याचे काम हाती घेतले होते. मात्र नऊ महिने उलटले तरीही ते काम पूर्ण झालेले नाही. या अपूर्ण कामामुळे गावातून येणारे सांडपाणी वाहून जाण्यासाठी अडथळा निर्माण झाला असून या ठिकाणाहून वाहन चालवणे मुश्कील झाले आहे. दुचाकीवरून जातांना तर तारेवरची कसरत करावी लागते तसेच मोरीच्या दोघेही बाजूने मोठ्या प्रमाणात पाणी साचून रस्त्यावरची वाहतूक ठप्प झालेली आहे. तसेच याच साचलेल्या पाण्यात डुकरे येऊन बसतात, डासांचा व दुर्गंधीचा त्रास वाढला असल्याने मोहम्मदिया शाळेजवळ घाणीचे साम्राज्य पसरले असून रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला असून या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या मागील एकमेव कारण म्हणजे फक्त आणि फक्त जामनेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अडेलटट्टू कारभारामुळे रस्त्यावर पडलेला खड्डा बुजवण्यासाठी वारंवार निवेदन देऊन, प्रत्यक्ष भेटून तसेच भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी लक्ष देत नसल्याने या अधिकाऱ्याला कुंभकर्ण झोपेतून उठवण्यासाठी व जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी शेंदुर्णी गावचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व जनतेला रस्ता रोको आंदोलन करण्याची वेळ येते ही खेदाची बाब असून जामनेर सार्वजनिक बांधकाम विभागात लोकशाही आहे की नोकरशाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नऊ महिने उलटल्यावर सुध्दा या समस्येकडे लक्ष दिले जात नसून शेवटचा पर्याय म्हणून शेंदुर्णी नगरीच्या नगराध्यक्षा सौ.विजयाताई खलसे व उपनगराध्यक्ष मा.श्री. निलेश थोरात यांनी जामनेर सार्वजनिक बांधकाम विभागाला एक निवेदन देऊन येत्या तीन दिवसांत या रस्त्याच्या कामाला सुरवात करावी अन्यथा दिनांक २५ जानेवारी मंगळवार रोजी शेंदुर्णी येथील सोयगाव रस्त्यावर सकाळी ११ वाजेपासून हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल व या आंदोलनामुळे होणाऱ्या परिणामास सार्वजनिक बांधकाम विभाग जामनेर हेच जबाबदार रहातील असा इशारा दिला आहे.
महत्त्वाचे~संबंधित ठेकेदार व संबंधीत अधिकारी यांचे हितसंबंध जवळचे असल्याकारणाने ठेकेदार मनमानी करत असल्याची चर्चा जनमानसातून एकावयास मिळते आहे.