पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, विद्युत पंपासह दोन चोरट्यांना केले जेरबंद. पंचक्रोशीतील जनतेतून समाधान.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/१२/२०२१
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील वरखेडी, भोकरी, लोहारी, सावखेडा, कु-हाड, सांगवी, मोहाडी येथे सतत होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे पिंपळगाव हरेश्वर पोलीसांवर चोहोबाजूंनी टिकेची झोड उठत असतांना दिनांक २२ बुधवार रोजी भल्या पहाटे १:३० वाजेच्या सुमारास वरखेडी येथे पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे पो.कॉ. अरूण राजपूत खाजगी वाहनाने व पोलीस वाहन चालक सचिन वाघ हे पोलीस ह्वॅनने गस्तीवर असतांना, अंबेवडगाव येथून गस्त घालून परत येत असतांना वरखेडी बस स्थानकाजवळ थांबलेले होते.
यावेळी पोलीस वाहन चालक यांच्यासह असलेल्या प्रज्वल नामक तरूणाला विसावा चौक येथे कुणीतरी लपलेला असून त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्याने पोलीस वाहन चालक सचिन वाघ यांना ही माहिती सांगीतली. सचिन वाघ यांनी खाजगी वाहनाने गस्तीवर असलेल्या पो.कॉ. अरूण राजपुत यांना ही माहिती देवून दुसऱ्या दिशेने बोलविले व या ठिकाणी दोन जणांना चोरीच्या तीन अश्वशक्तीच्या विद्यूत पंपासह पकडले. पोलीसांनी त्यांना विचारले असतांना शेतातून आलो आहे असे सांगितले. परंतू पोलिसी हिसका दाखवताच तो पोपटासारखा बोलु लागला.
नंतर त्यांचे मोबाईलमध्ये फोटो काढून झाल्यावर, दोघांचे मोबाईल व बिना नंबरप्लेटची हिरो होंडा मोटारसायकल जप्त केल्यावर चोरून आणलेले विद्यूत पंप चोरट्यांकडूनच पोलिस गाडीत ठेवून घेतला. चोरलेला विद्यूत पंप पोलीस वाहनात ठेवल्यावर संधी साधून हे दोघे चोर पळून गेले. पैकी एकाचा पोलिसांनी पाठलाग देखील केला. शेवटी एक चोरटा भोकरी गावात घुसला तर दुसरा डांभूर्णी रस्त्याने पळण्यात यशस्वी झाला. याच दरम्यान पोलिसांनी चोरट्यांकडून जमा केलेल्या मोबाईल वर त्यांच्या तिसऱ्या सहकाऱ्याचा बऱ्याच वेळा कॉल आला होता. यावेळी पोलीसांना वरखेडी येथील पत्रकार मा.श्री. हेमशंकर तिवारी, पो.पा. मा.श्री. बाळू कुमावत, मा.श्री. दिपक बागूल, मा.श्री. किशोर पाटील यांनी देखील मदत केली म्हणून पिंपळगाव हरेश्वरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये साहेब यांनी याच्या धाडसाचे कौतुक करत सर्वांचे आभार मानले.
रात्रीची घडलेली घटना दिवस उजाडल्यावर वाऱ्यासारखी गावपरिसरात पसरली. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांनी बस स्थानकावर सकाळी, सकाळी या चोरट्याला पकडून ठेवले व पोलीस पाटील मा.श्री. बाळू कुमावत यांच्या स्वाधीन केले त्यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांना कळवून त्यांच्या ताब्यात दिले. या चोरट्यांनी पोलीसांना व स्थानिकांना रात्रभर चोर-पोलीस चा खेळ खेळवला. अखेरीस एक चोरटा पोलिसांच्या हाती लागला असून या चोरट्यांकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(पिंपळगाव हरेश्वर पोलिस खेळले अशीही खेळी, चोरट्यांची बसली दातखीळी.)
सततच्या चोऱ्यांचे सत्र सुरु असल्याने पिंपळगाव हरेश्वर पोलिसांवर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवला जात होता. म्हणून आरोपींना पकडल्याशिवाय शांत बसायचे नाही हा चंग मनाशी करुन पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस रात्रीची गस्त घालत असतांना देखील घरफोडी करणारे किंवा शेतातील विद्यूत पंप चोरणारे हाती लागत नव्हते. म्हणून पोलीसांनी नवीन शक्कल लढवत एक पथक चोरट्यांचे लक्ष वेधण्यासाठी एका बाजूला सायरन वाजवत पोलीस व्हॅन वरील लाईट सुरू ठेवून फिरवायची व दुसरीकडे दुसरे पथक खाजगी वाहनावर फिरवायचे हा फंडा वापरण्यात आला.
हा फंडा यशस्वीही झाला. पोलिसांच्या अपेक्षेप्रमाणे बुधवारी सावखेडा शिवारातील विद्यूतपंप चोरी प्रकरणी मुजाहिदिन शे. रफीक शेख (वय-२९) पाचोरा याला रंगेहाथ पकडून त्याच्या विरूद्ध गुन्हा रजि.नं.,३३६/२१, कलम ३७९,३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर दुसरा अमिन इस्माईल मिर्झा हा फरार झाला आहे.
या पोलिसांच्या कामगिरीबद्दल पंचक्रोशीतील गावा, गावातून पोलिसांचे कौतुक होत चोरटे पकडले गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील धास्ती दुर झाली आहे.