जामनेर तालुक्यात ट्रॅव्हल्स बसने दोन शाळकरी मुलांना उडविले; तीन वर्षीय बालक जागीच ठार तर दुसरा गंभीर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/१२/२०२१
जामनेर तालुक्यातील धामणगाव बढे येथून जामनेर येथे प्रवासी घेऊन जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल बसने शाळेत जाणाऱ्या दोन चिमुकल्या मुलांना जोरदार धडक दिली. यामध्ये तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून त्याचा पाच वर्षीय भाऊ जखमी झाला आहे. या अपघातात एका बालकाचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त जमावाने ट्रॅव्हल बसची तोडफोड केली.पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. बालकाच्या मृत्यूमुळे पंचक्रोशीतील गावागावातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
बुलढाणा तालुक्यातील धामणगाव बढे येथून जामनेर येथे प्रवासी घेऊन बालाजी ट्रॅव्हल्स (एम एच २१ बीएच ०६४७) ही बस शनिवारी ४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी निघाली होती. बस देऊळगाव बस स्थानकाजवळ आली असतांना दोन लहान सख्खे भाऊ रेहान नशीब तडवी (वय ५ वर्ष) आणि आर्यन नसीब तडवी (वय ३ वर्ष) यांना जबर धडक दिली.
जखमी बालकांना आजूबाजूच्या नागरिकांनी बुलढाणा येथे उपचारार्थ हलविले. त्यामध्ये ३ वर्षीय आर्यन याचा मृत्यू झाला तर ५ वर्षीय रेहान गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त करत त्यांनी ट्रॅव्हल्स वाहनाची तोडफोड केली. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याची माहिती मिळताच पहूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
देऊळगाव येथील संतप्त नागरिकांना समजावण्यासाठी प्रतिष्ठित नागरिकांनी व सुज्ञ नागरिकांनी महत्वाची भूमिका बजावली. दरम्यान दुर्घटनेतील ट्रॅव्हल्सचे वाहन चालक आणि वाहक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहेत. एका बाजूला चिमुकल्या आर्यन याच्या मृत्यूमुळे कष्टकरी तडवी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.