अल्पावधीतच लाखोंची माया जमवणारा, पाचोरा तालुक्यातील तो तांदूळ सम्राट कोण ?

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/११/२०२१
पाचोरा तालुक्यातील रेशनिंग दुकान, रेशन कार्ड बनवण्यापासून तर धान्य वाटपातील चाललेल्या अनागोंदी कारभाराबाबत अनेक किस्से समोर येत आहेत. परंतु (हमाम मे सब नंगे) असा प्रकार सुरु असून या विभागातील (काही) जबाबदार अधिकारी व रेशनिंग दुकानदार हे या रेशनिंग दुकानात गोरगरिबांच्या वाट्यावरील तांदळाचा काळाबाजार करुन खीर बनवून भरपेट खात असल्याने काहींच्या आर्थिक (लाखोंच्या) आकडेवारीत रोकड व स्थावर मालमत्ता तर काहींच्या ढेऱ्या मोठ्या प्रमाणात फूगल्याचे दिसून येत आहे.
यामागील कारण म्हणजे धान्य वितरण व्यवस्थेतील ढसाळ कारभार कारणीभूत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण आजपर्यंत बऱ्याचशा ठिकाणी तांदळाच्या काळ्याबाजारात गाड्या पकडण्यात आल्या तरीही पाहिजे तेवढी ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप जनतेतून केला जात आहे.
तसेच पाचोरा तालुक्यातील बरीचशी स्वस्त धान्य दुकाने ही नामधारी एक तर दुकान चालवणारे दुसरेच आहेत. बरीचशी दुकाने वेगवेगळ्या संस्था व बचतगटांच्या नावाने घेण्यात आली आहेत. परंतु प्रत्यक्षात पाहिले असता काही दुकाने संबधीतांनी दरमहा काहीतरी आर्थिक देवाणघेवाणीच्या अटी, शर्ती वर काही भांडवलदार लोकांना चालवण्यासाठी दिलेली असल्याचे चर्चिले जात आहे.
तसेच मागील वर्षापासून कोरोनाची लागण झाल्यापासून सगळीकडे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या हाताला काम नसल्याचे लक्षात घेऊन शासनाने जनतेवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून अल्पदरात तसेच मोफत धान्य वाटप करण्याची योजना आमलात आणून वाढीव धान्य वाटपाचे आदेश दिले होते.
याच संधीचा फायदा घेत पाचोरा तालुक्यातील बऱ्याचशा झारीतल्या शुक्राचार्यांनी आर्थिक देवाणघेवाणीच्या व थोड्याफार पोपटपंची करणाऱ्या पांढरपेशांच्या बळावर शासकीय नियमांची पायमल्ली करत लाभार्थ्यांना मिळणारे धान्य विशेष करुन तांदूळ वाटपात मोठा घोटाळा करुन सर्वसामान्य जनतेच्या जनतेच्या वाट्यावरील धान्य हिरावून घेत पाचोरा, भडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात काळाबाजार करत असून तसेच रेशनिंगचा तांदूळ दहा रुपये किलो प्रमाणे खरेदी करुन हा तांदूळ मोठमोठे कंटेनर भरून बाहेर राज्यात रवाना करण्याचा गोरखधंदा सुरु केला आहे.
यात पाचोरा तालुक्यातील एका खेडेगावातील एका रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तीने अल्पावधीतच लाखोंची माया जमवून लाखो रुपये किंमतीची शेतजमीन व किंमती आरामदायी अशी अलिशान गाडी घेतली असून तीस लाख रुपयांचा ताजमहाल बांधला असल्याची जोरदार चर्चा तालुकाभरातील जनतेतून मोठ्या प्रमाणात ऐकायला येत असून याबाबत हातोहात, रातोरात लखपती झालेली व्यक्ती कोण हा कुतुहलाचा विषय ठरत आहे.
या प्रकाराची सखोल चौकशी झाल्यास शासकीय धान्य घोटाळा हा किती मोठ्या प्रमाणात होत आहे व यात कोणकोणते रथी, महारथी सामील आहेत हे नक्कीच बाहेर येईल परंतु या धान्य घोटाळा महारथींची दहशत असल्याने कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याचे हा प्रकार दिवसाढवळ्या सुरु असल्याचे दिसून येत आहे.