सुनील लोहार.(कुऱ्हाड) ता.पाचोरा
दिनांक~०७/१०/२०२२

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील रहिवाशी किरण बाबुलाल कुंभार वय वर्षे (४५) हे कल्याण येथे रिक्षा व केटरिंग व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले होते. हे केटरिंगच्या व्यवसायासोबतच रिक्षा चालवून प्रवासी वाहतूक करत होते. असेच दररोज प्रमाणे दसऱ्याच्या दिवशी एका ठिकाणी नवरात्रोत्सवाच्या भंडाऱ्याचा स्वयंपाक आटोपून सायंकाळी ते स्वताच्या रिक्षातून घराकडे निघाले असता मागून येणाऱ्या भरधाव स्कूल बसने किरण कुंभार यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली धडक इतकी जोरदार होती की काही कळायच्या आतच किरण कुंभार यांचा जागेवरच मृत्यू झाला.

या अपघाताची बातमी कुऱ्हाड गावात समजताच ऐन दसऱ्याच्या दिवशी सर्व गाव आनंदात असतांनाच ही अपघाताची बातमी माहीत पडताच सर्व गावत शोकमय वातावरण निर्माण झाले व सगळ्यांनी किरण कुंभार यांच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी त्याच्या कुटुंबातील सदस्यांना हा आघात सहन न झाल्याने काही सदस्य बेशुद्ध होऊन पडले होते तर इतर सदस्यांचा आक्रोश पाहून जमलेल्या सगळ्या गावकऱ्यांचे काळीज हेलावून घेत होते.

ही बातमी माहीत पडताच कुऱ्हाड येथील शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, शिवसेनेचे विभागप्रमुख तानाजी पाटील, लोकमतचे पत्रकार सुनील लोहार यांनी लगेचच मुंबई येथे जाऊन मयत किरण कुंभार यांचे कायदेशीर शवविच्छेदन करून मृतदेह कुऱ्हाड आणून कुऱ्हाड येथील स्मशानभूमीत किरण कुंभार याच्यावर शोकमग्न वातावरण अंतिम संस्कार करण्यात आले.

मयत किरण कुंभार हे जरी व्यवसायानिमित्त मुंबई येथे रहात होते तरीही त्यांचा गावाबद्दल असलेला जिव्हाळा व जन्मभूमी बद्दल असलेले प्रेम कायम होते. कुऱ्हाड गावात सामाजिक, धार्मिक कार्यक्रमासाठी वर्गणी देत असत. तसेच कुणालाही काही मदत लागल्यास किंवा मुंबई येथे वैद्यकीय उपचारासाठी पंचक्रोशीतील कोणीही गेल्यावर ते स्वताच्या रिक्षातून त्यांना ते स्वखर्चाने घेऊन जात असत. त्यांचा मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी कल्याण तसेच कुऱ्हाड येथील सर्वसामान्यांना आपलेसे करून घेतले होते. असा हा मनमिळाऊ स्वभावाचा किरण कुंभार अचानकपणे निघून गेल्यामुळे कुऱ्हाड गावासह पंचक्रोशीतील गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मयत किरण कुंभार यांच्या पाश्चात्य लहान भाऊ, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, असा परिवार आहे.