एस.टी.च्या संपामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला. त्वरीत संप न मिटल्यास प्रवासी संघटना आंदोलनाच्या तयारीत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/११/२०२१
एस.टी. चा प्रवास सुरक्षित प्रवास असे म्हटले जाते तसेच सर्वसामान्य जनतेची लालपरी म्हणून एस.टी.ओळख असून अंध, अपंग, वयोवृद्ध तसेच सर्वसामान्य प्रवाशांच्या हक्काची व भरवश्याच्या एस.टी.ची चाके थांबल्यामुळे सर्वसामान्य जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
कारण एस.टी.कर्मच्याऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारल्याने एस.टी.च्या प्रवाशांची परिस्थिती ना घरचा ना घाटचा अशी झाली असून आपल्या अत्यावश्यक दैनंदिन कामकाजासाठी प्रवास करणे गरजेचे असल्याने गरजू लोक मिळेल त्या वाहनाव्दारे प्रवास करुन आपले दैनंदिन कामकाज पार पाडत आहेत.
परंतु असे करतांना गरजे प्रवाशांना अवैध वाहतूक व मालवाहू वाहनांचा सहारा घ्यावा लागत आहे. याचाच फायदा घेत अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहनधारक प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेत आपल्या वाहनात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून जीवघेणी वाहतूक करत आहेत. सोबतच गरजू प्रवाशांकडून मनमानी भाडे वसूल करत आहेत.
तसेच दिवाळीच्या सणानिमित्त आया,बहिणींना माहेरी जाणे व परत येण्यासाठी खूपच अडचणीचे झाले असून त्यांनाही मिळेल त्या वाहनात बसून आलेल्या प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. कारण रेल्वेच्या सुविधा व तिकीट मिळवणे अवघड झाले आहे. तसेच दिवाळीच्या सणासुदीला ग्रामीण भागातील माता,भगिनींना माहेरी जाण्याची ओढ असते व याच कालावधीत एस.टी. चा संप सुरु झाल्यामुळे काही महिला माहेरी जाऊ शकल्या नाहीत तर काही माहेरी गेल्या आहेत परंतु त्यांना परत येण्यासाठी खुपच अडचणीचे झाले असल्याने मिळेल त्या वाहनातून प्रवास करत आहेत. तसेच दुचाकीवरून प्रवास करतांना तीन ते पाच लहानमोठे लोक बसून जीवघेणा प्रवास करत आहेत.
या गरजेपोटी कराव्या लागणाऱ्या प्रवासात लहानमोठे अपघात होत असून काही ठिकाणी जीवितहानी सुध्दा झाल्याच्या घटना घडत आहेत. म्हणून शासनाने त्वरीत तोडगा काढून एस.टी. च्या प्रवाशांची होणारी फरपट व गैरसोय त्वरित दुर करावी अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत असून लवकरात लवकर एस.टी.बसेस सुरु न झाल्यास प्रवासी संघटना रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.