गावचा गाव जळे, हनुमान बेंबी चोळे अवैधधंदे सुरु ठेवण्यासाठीही प्रतिष्ठा पणाला.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/११/२०२१
पाचोरा तालुक्यातील बऱ्याचशा गावात सट्टा, पत्ता, जुगार, गावठी दारू व देशी दारूची खुलेआम विक्री असे अवैधधंदे दिवसाढवळ्या दिवसरात्र सुरु आहेत. हे अवैधधंदे सुरु असले म्हणजे फक्त आणि फक्त दारुबंदी खाते व पोलिसांना टार्गेट केले जाते किंवा त्याच्याविरोधात वारंवार ओरड केली जात असली तरीही हे अवैधधंदे सुरुच असतात.
या मागील कारण म्हणजे गावागावातील स्थानिक राजकारण असल्याचे दिसून येते. बऱ्याचशा गावातील जबाबदार व्यक्ती सरपंच, पोलिस पाटील यांची जबाबदारी असल्यावरही ते या अवैधधंद्याचे बाबतीत दुर्लक्ष करतात यात काही ठिकाणी सबंधिताचा पाठिंबा असतो तर काही ठिकाणी त्यांना गुमान चूप बसावे लागते. कारण विरोधात असलेले लोक या अवैधधंदे करणारांची पाठराखण करतांना दिसून येतात.
असाच काहीसा प्रकार पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक या गावात पहावयास मिळत आहे. या दोघेही गावात सट्टा, पत्ता, जुगार, देशी व गावठी दारुची विक्रीसह सगळे अवैधधंदे खुलेआम सुरु आहेत. या गावातील अवैधधंद्याचे दुष्परिणाम सांगवी, साजगाव, बिल्धी, सार्वे, जामने, अंबे वडगाव खुर्द, अंबे वडगाव बुद्रुक, कुऱ्हाड तांडा या गावात दिसून येतात.
कारण कुऱ्हाड येथे मोठ्या प्रमाणात गावठी दारु निर्मिती केली जाते. ही दारु आसपासच्या गावांना स्वयंचलित दुचाकीवरून ठोक भावात विक्री केली जाते. तसेच कुऱ्हाड गावात सुरु असलेल्या सट्टा, पत्ता व जुगाराच्या अड्यावर आसपासच्या गावातील तसेच इतर खेड्यापाड्यातील लोक आपला शौक पूर्ण करण्यासाठी येत असल्याने या गावात जणू एकप्रकारे यात्राच भरतांना दिसून येते.
या गावातील स्वताला प्रतिष्ठित म्हणून घेणारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून हे पांढरपेशी काही कथीत पुढारी कायदा आमच्या खिशात असून आमची वरपर्यंत ओळख असल्याचा आव आणत या अवैधधंदे करणारांची पाठराखण करतांना दिसून येतात. परंतु या प्रकारामुळे वरील दोघेही गावात अशांतता पसरली असून दररोज भांडण, तंटे होत आहेत.
तसेच १ नोव्हेंबर सोमवार रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी कुऱ्हाड गावात अवैधधंद्याचे विरोधात धाडसत्र राबवून एका जुगार अड्ड्यावर कारवाई केली आहे. ही कारवाई झाल्यानंतर कुऱ्हाड सह इतर गावातील जनतेतून पिंपळगाव पोलिसांचे आभार मानत अवैधधंद्याचे विरोध सतत कारवाई करुन हे अवैधधंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
परंतु कारवाईच्या दुसऱ्यादिवशी मात्र अवैधधंदे करणारांनी पुन्हा डरकाळी फोडून एका प्रतिष्ठित नागरिकाला त्रास देऊन दहशत माजवण्यासाठीचा केविलवाणा प्रकार केला असून पत्रकारांना पाहून घेऊ पोलिस आमचे काहीच करु शकत नाहीत अशी शेखी मिरवत आहेत.
तसेच आज कुऱ्हाड येथील आठवडे बाजार असल्याने याचा फायदा घेत अवैधधंदे करणारांनी आपली दुकाने पुन्हा थाटली असून आमच्या विरोधात कोण काय करतो हे आम्ही पाहून घेऊ असा दम भरत आहेत.
परंतु मिळालेल्या माहितीनुसार कुऱ्हाड ग्रामपंचायतीचे सरपंच हे लवकरच अवैधधंद्याचे विरोधात ग्रामसभेचा ठराव घेऊन हे अवैधधंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे बोलले जात असून कुऱ्हाड गावासाठी पोलिस पाटील पद रिक्त असल्याने यांची लवकरात लवकर नियुक्ती करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे समजते.