जिल्हापरिषद मराठी मुलांच्या शाळेत, दत्त माध्यमिक विद्यालयाचे अतिक्रमण.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१०/०२/२०२४
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या लोहारी येथील बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशन पाचोरा संचलित दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संचालकाने कोणतीही रितसर परवानगी न घेता लोहारी येथील काही लोकांना हाताशी धरुन लोहारी येथील जिल्हापरिषदेच्या शाळेत मागील एक वर्षापासून बस्तान बसवले असून जिल्हापरिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीचा वापर करुन घेत आहे. या प्रकारामुळे लोहारी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून ही जिल्हापरिषद मराठी मुलांची शाळा गावातील काही लोक विकून तर टाकणार नाही ना अशी शंका व्यक्त केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की लोहारी येथील दत्त माध्यमिक शिक्षण संस्था ही काही वर्षांपूर्वी बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशन पाचोरा यांनी विकत घेतली आहे. परंतु ही संस्था विकत घेतांना बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशन पाचोरा यांनी दत्त माध्यमिक शिक्षण संस्थेची स्थावर मालमत्ता म्हणजे इमारत विकत घेतली नसल्याने या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देणे क्रमप्राप्त होते.
ऐनवेळी दुसरीकडे इमारतीचे बांधकाम करणे शक्य नसल्याने संबंधित बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशन पाचोरा संचालकांनी पध्दतशीरपणे त्यांच्याच संस्थेत असलेल्या लोहारी येथील एका शिक्षकाची प्रभारी मुख्याध्यापक पदी नियुक्ती करुन गावातील सरपंच, सरस्य व जिल्हापरिषद मराठी शाळेच्या शिक्षण समितीला हाताशी धरुन जिल्हापरिषद मराठी मुलांच्या शाळेची इमारत भाडेतत्त्वावर घेण्याचा घाट घातला. गावातीलच मुलगा मुख्याध्यापक असल्याकारणाने व ऐनवेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून लोहारी तेथील सरपंच, सदस्य व जिल्हापरिषद मराठी मुलांच्या शाळेच्या शिक्षण समितीला हाताशी धरुन कोणतीही ग्रामसभा न घेता इमारत भाडे तत्वावर देण्याचा ठराव करुन घेत मंजूरीसाठी जिल्हापरिषद जळगाव, गटविकास अधिकारी पाचोरा व संबंधित विभागाकडे पाठविला आहे.
हा ठराव पाठवल्यानंतर या ठरावाला मंजुरी आल्यावरच भाडेतत्त्वावर वापरासाठी देणे बंधनकारक असतांनाही शाळा खोल्या भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव प्रलंबित असतांना तसेच शासकीय नियमानुसार बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जिल्हापरिषद जळगाव यांच्याकडे प्रस्ताव सादर करुन मंजूरी मिळाल्यानंतर जिल्हापरिषद जळगाव बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी निश्चित केलेल्या दराने शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर अटी, सुचना लिहून घेत फक्त अकरा महिन्याच्या कराराने भाडेतत्त्वावर देणे बंधनकारक असल्यावरही संबंधित विभागाकडून कोणतीही पूर्व परवानगी न येताच ही इमारत मागील एक वर्षापासून बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशन पाचोरा यांच्या ताब्यात देण्यात आली आहे.
वास्तविक पाहता संबंधित विभागाकडून रितसर परवानगी आल्यानंतर संबंधित इमारतीचे मोजमाप करुन किती वर्गखोल्या तसेच किती स्क्वेअर फूट पटांगण ताब्यात देण्यात येणार आहे याचे मोजमाप करुन शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार भाडे आकारणी करणे गरजेचे आहे. तसेच भाडेतत्त्वावर वापरासाठी देण्यात येणाऱ्या इमारतीची देखभाल, दुरुस्ती, विज, पाणी, ग्रामपंचायतीचा कर नियमितपणे भरण्याची जबाबदारी निश्चित करुन घेणे महत्त्वाचे होते. परंतु अशी कोणतीही तजवीज केली गेली नसल्याचे दिसून येत आहे. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना शौचालय, बाथरुम, पिण्यासाठी शुद्ध पाणी व इतर सुविधा पुरविणे ही संस्थेची जबाबदारी असल्यावरही या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या नाहीत.
विशेष महत्वाचे म्हणजे संबंधित विभागाकडून कोणतीही रितसर परवानगी न घेताच मागील एक वर्षापासून लोहारी येथील जिल्हापरिषदेच्या शाळेत बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशन पाचोरा यांनी घुसखोरी केली असल्याने लोहारी येथील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून भविष्यात आम्ही याच शाळेत पुढील वर्ग सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असल्याने ही इमारत भाड्याने देण्यात येऊ नये अशी भुमिका घेत आम्ही लवकर आंदोलन छेडण्याचा तयारीत आहोत असे सांगितले.