जामनेर व पाचोरा तालुक्यात बुवाबाजीला ऊत, पाच हजार रुपये दिल्यावर निघते अंगातले भूत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०७/२०२१
मागील आठवड्यात जामनेर तालुक्यातील स्वयंघोषित एका भोंदूबाबाने लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने एका गरजू तरुणास दीडलाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला रीतसर गुन्हा दाखल झाला असून स्वयंघोषित बाबाला अटक करण्यात आली आहे.
तरीसुद्धा आजही पाचोरा व जामनेर तालुक्यात काही ठिकाणी धार्मिक स्थळांचा आधार घेत तर काही ठिकाणी स्वतःच्या शेतात व घरात धार्मिक स्थळ निर्मिती करून या ठिकाणी स्वतःला स्वयंघोषित बाबा असल्याचे सांगून या धर्म स्थळांना अंधश्रद्धेचा अड्डा बनवून याठिकाणी जादूटोणा, भूतबाधा, विविध आजारावर उपचार करण्यासाठीचे मांत्रिक उपचार करण्याच्या बहाण्याने जादूटोणा केला जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात २५ जुलै, २०२१ पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) लागू करण्यात आले आहे.
या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या कार्यालयाची पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.
तसेच संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले असल्यावरही या धार्मिक स्थळांवर अंधश्रदाळुंची एकच गर्दी होत असल्याने लॉकडाऊच्या नियमांची पायमल्ली होत आहे.
तसेच या कारणामुळे जामनेर व पाचोरा तालुक्यात अंधश्रद्धा वाढीस लागत असून यातून करणी, कवटाळच्या नावाखाली कोंबड्या-बकऱ्याचा बळी देणे, धागादोरा व तावीत करणे पीडित पुरुष व महिलांना मंत्रोपचार करत अंघोळ घालने, पुत्रप्राप्तीसाठी आघोरी उपाय कारणे तसेच गुप्तधन काढण्यासाठी बळी देणे असे प्रकार राजरोसपणे सुरू असून हे विधी करण्यासाठी हजार, पाच हजार तसेच समोरच्या व्यक्तीची मानसिकता व आर्थिक परिस्थिती पाहून पैशाची लुट केली जात आहे.
विशेष म्हणजे जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी व मोराड येथे व अंबे वडगाव परिसरातील एका शेतात व इतर ठिकाणी हा धिंगाणा दिवसाढवळ्या राजरोसपणे सुरु असल्यावरही अंधश्रद्धा निर्मूलन समिती व कायद्याचे रक्षक तसेच स्वतःला समाजसेवक म्हणून घेणारे जागरूक नागरिक यांचे दुर्लक्ष होत असल्याने या बुवाबाजीच्या अड्ड्यावर ठराविक दिवशी अंधश्रद्धाळू भाविक भक्तांची हजारो रुपयात लूट होत असून अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात आहे.
तसे पाहिले तर महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम २०१३”,हा महाराष्ट्र राज्यातील एक गुन्हेगारी कायदा आहे,मुळात हा कायदा २००३ मध्ये जादूटोणाविरोधी कार्यकर्ते आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती(अंनिस)चे संस्थापक नरेंद्र दाभोळकर (१९४५-२०१३) यांनी तयार केलेला आहे. हा कायदा जादूटोणा,नरबळी,आजार बरे करण्यासाठी काळ्या जादूचा वापर आणि अशाच प्रकारच्या अनेक कृती ज्यामुळे लोकांच्या अंधश्रद्धांचे शोषण होऊ शकेल त्यांना गुन्हेगारी अपराध ठरवितो.
जादूटोणाविरोधी कायद्यातील कलमानुसार भूत उतरविण्याच्या बहाण्यानं चमत्काराचा प्रयोग गुप्तधन, जारण मारण करणी भानामती या नावानं अमानुष, अनीष्ट, अघोरी कृत्य करणे, नरबळी देणे, एखादी व्यक्ती करणी करते, जादुटोणा करते, भूत लावते, अपशकुनी आहे, सैतान आहे असं जाहीर करणं, भूत पिशाच्चाना आवाहन करून घबराट निर्माण करणे हे कृत्य करणे कायद्यानुसार गुन्हा आहे. तरीही वरील गैरप्रकार राजरोसपणे सुरु असल्याने सुज्ञ नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त करत कारवाईची मागणी होत आहे.
कारण या बुवाबाजीच्या नादात या आधी काही ठिकाणी नरबळी दिल्याच्या घटना घडल्या आहेत. म्हणून भविष्यातही नरबळी देण्यासारखे प्रकार घडू शकतात ही शक्यता नाकारत येत नाही. अशी भिती व्यक्त केली जात आहे.