निलंबना नंतर आमदार गिरीश महाजनांची घणाघाती टीका.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०७/२०२१
मुंबईत सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात गिरीश महाजन व इतर आमदारांनी ओबीसी मुद्यावरून गोंधळ घातला म्हणून गिरीश महाजनांनसह १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित केल्यानंतर आमदार गिरीश महाजनांनी प्रखरपणे मत मांडले व महाविकास आघाडी सरकारला पावसाळी अधिवेशन गुंडाळण्याची घाई झाली असून यात ओबीसी आरक्षणाला पध्दतशीरपणे खो देण्यासाठी आणि भाजपचे सभागृहातील संख्याबळ कमी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारने आमदार निलंबनाचा कुटील डाव रचल्याची घणाघाती टीका माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी केली आहे.
आज राज्य विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबीत करण्यात आले. यात माजी मंत्री तथा जामनेरचे आमदार गिरीशभाऊ महाजन यांचा देखील समावेश आहे. निलंबनावर त्यांनी अतिशय जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. गिरीशभाऊ म्हणाले की, राज्यातील ओबीसी समुदायाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले असले तरी महाविकास आघाडी सरकार ढिम्म बसून आहे. त्यांना ओबीसींना हक्क द्यायचे नाहीत. यामुळे आज कथितरित्या ओबीसी हिताचा आव आणला असला तरी प्रत्यक्षात ओबीसींच्या आवाजाची मुस्कटदाबी करण्याचे कारस्थान सरकारने रचले आहे. यामुळे सभागृहात चर्चेची तयारी दाखविणार्या भाजपच्या बारा आमदारांना निलंबीत करण्यात आले आहे.