सत्यजीत न्यूजला बातमी येताच कुऱ्हाड येथील बसस्थानक परिसरात शुकशुकाट. मात्र कारवाई शुन्य.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०१/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील अवैधधंद्याचे बाबतीत कुऱ्हाड येथील महिलांनी सत्यजीत न्यूजकडे गाऱ्हाणे मांडत अवैधधंदे कायमस्वरूपी बंदव्हावेत म्हणून साकडे घातले होते. याची दखल घेत दिनांक सात जानेवारी गुरुवारी
【जो बंद करेल गावातील सट्टा, पत्ता, दारु त्यालाच आम्ही मतदान करु. कुऱ्हाड येथील महिलांचा जाहीर फतवा.】
या शिर्षकाखाली बातमी प्रकाशित होताच कुऱ्हाड गावातील महिला व सुज्ञ नागरीकांनी सत्यजीत न्यूजला धन्यवाद देत अवैधधंद्याचा कायमस्वरूपी बिमोड व्हावा अशी इच्छा व्यक्त करत कडक कारवाईची मागणी केली आहे.
तर दुसऱ्या गटाकडून ही बातमी निवडणूक काळात लावायला नको होती ती रद्द करा असे सांगत नाराजी व्यक्त केली.
मात्र दिनांक आठ जानेवारी शुक्रवारी कुऱ्हाड येथे भेट देऊन कानोसा घेतला असता सट्टा बेटिंग व दारुविक्रेते हाताची घडी व तोंडावर बोट ठेवून पुढे काय होईल या धास्तीने चुपचाप बसले असले तरी अद्यापही संबंधित जबाबदार अधिकारी किंवा प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याने पुन्हा अवैधधंदे सुरु होतील असे बोलले जात आहे.
तसेच आता मोबाईलवर सट्टा बेटिंग घेतली जात असून मोबाईलवरच मागेल त्याला दारु पुरवण्यासाठी पंटर नेमण्यात आले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
तरी या अवैधधंदे करणारावर वरिष्ठ पातळीवरुन कडक कारवाई होऊन हे अवैधधंदे कायमस्वरूपी बंद केल्यास वाममार्गाला जाणारी तरुण पिढी व व्यसनाने बर्बाद होणारी कुटुंब वाचतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
(सत्यजीत न्यूज दारूभट्ट्या, सट्टा पेढी व जुगाराचे काही छायाचित्र व चित्रफीत मिळवून सविस्तर वृत्त लगेचच जनतेसमोर मांडणार आहे.)