मागील भांडणाच्या कारणावरुन एकाला मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०४/२०२४
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी ग्रामपंचायतीचे सरपंच अपात्र झाल्यापासून भोकरी गावात दररोज नवनवीन घटना घडत आहेत. आजही सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मागील भांडणाचा रोष मनात ठेवून एका इसमाला अपात्र झालेले सरपंच व त्यांच्या घरातील दोन महिलांनी रस्त्यावर गाठून चापटा, बुक्क्यांनी मारठोक केल्याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की भोकरी ग्रामपंचायतीचे सरपंच अरमान अब्दुल काकर हे दोन पेक्षा जास्त अपत्ये असल्याकारणाने त्यांना नुकतेच अपात्र घोषित करण्यात आले आहे. ही अपात्रतेची कारवाई झाल्यापासून भोकरी गावात एकमेकांविषयी गैरसमज निर्माण झाले आहेत. हाच गैरसमज मनात ठेवून आज दुपारी साडेअकरा वाजता अरमान अब्दुल काकर, शबाना अरमान काकार व रजीया अब्दुल काकर यांनी शकील सत्तार काकर हे लग्नाच्या ठिकाणी रस्त्याने जात असतांना त्यांना नुराणी मशीद जवळ रस्त्यावर अडवून तु जास्त मातुन गेला आहे मागील भांडणात तु पण होता असे बोलून शिवीगाळ करत चापटा, बुक्क्यांनी मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.
या घटनेवरुन फिर्यादी शकिल सत्तार काकर यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दाखल केली असून भादवि कलम ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला असून अकील अहमद काकार व अकील महेमुद काकर यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय माळी करत आहेत.