गुढीपाडव्याच्या पुर्वसंध्येला पिंपळगाव हरेश्वर पोलीसांकडून वडगाव आंबे येथे झाडाझडती.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०४/२०२४
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे येथे काल दिनांक ०८ एप्रिल २०२४ सोमवार रोजी सायंकाळी पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी वडगाव आंबे, वडगाव आंबे खुर्द व वडगाव आंबे बुद्रुक येथे येऊन गावठी व देशी दारुची अवैध विक्री करणारांच्या घरी जाऊन झाडाझडती घेत यापुढे अवैध दारुची विक्री केली तर कठोर कारवाई करण्यात येईल अशी समज दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे येथे सालाबादप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी श्री. अंबिका मातेचा यात्रोत्सव साजरा करण्यात येतो. या यात्रोत्सव निमित्ताने अंबिका देवीच्या मंदिरात सकाळी ध्वजारोहण, दुपारी उपहार व महाआरती, चार वाजता बारा गाड्या व रात्री लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आलेले असते या निमित्ताने श्री. अंबिका मातेचे भाविक भक्त संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात ही यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
हा यात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी दरवर्षी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून चोख बंदोबस्त ठेवला जोडतो याच पार्श्वभूमीवर काल वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रकाश काळे यांच्या आदेशानुसार पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल मा. श्री. रणजित पाटील, मा. श्री. जितेंद्र पाटील व सहकाऱ्यांनी वडगाव आंबे, वडगाव आंबे खुर्द व वडगाव आंबे बुद्रुक गावात धाडसत्र राबवून गावठी व देशी दारुची अवैध विक्री करणारांच्या घरी झाडाझडती घेतली व यापुढे दारुची विक्री केल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल अशी समज दिली.
ही झाडाझडती घेत असतांनाच वडगाव आंबे गावातील एका इसमाकडे गावठी दारुचे पाऊच (पोतरी) कॅरी बॅग आढळून आल्याने त्यांच्या विरोधात दारुबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी केलेल्या या कारवाईबाबत वडगाव आंबे येथील सुज्ञ नागरिकांनी त्यांचे आभार मानले असून वडगाव आंबे येथे सुरु असलेली अवैध दारुची विक्री कायमस्वरूपी बंद करवी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.