कोल्हे गावाजवळील फरशी पुलावर पडला मोठा खड्डा, अपघाताची शक्यता असल्याने नवीन पुलाची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०४/२०२४
पाचोरा तालुक्यातील कोल्हे गावाजवळ असलेल्या नांदोळ नदीच्या पुलावर मध्यभागी मोठा खड्डा पडल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला असून एखाद्यावेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या नांदोळ नदीवरील पुलाचे बांधकाम सन १९८४ मध्ये करण्यात आले आहे. हे बांधकाम करतांना संबंधित ठेकेदाराने या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करुन बांधकाम केले होते. हे बांधकाम सुरु असतांना कोल्हे ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करुनही काहीएक फायदा झाला नसल्यामुळे त्याचे दुष्परिणाम आता जाणवत असल्याचे मत कोल्हे ग्रामस्थांनी व्यक्त करत या कमकुवत झालेल्या पुलाच्या ठिकाणी नविन जास्त उंचीचा पुल बांधून मिळावा अशी मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील कोल्हे हे गाव पाचोरा व सोयगाव या दोन तालुक्याच्या सरहद्दीवर असलेले गाव कोल्हे गावापासून काही किलोमीटर अंतरावर मराठवाड्याची हद्द सुरु होते. याच कोल्हे गावाची जुनी वस्ती व नव्याने वसलेले कोल्हे गावातील इंदिरा आवास नगर या दोन वस्ती नांदोळ नदी गेली आहे. या नदीवर सन १९८४ मध्ये कमी उंचीचा फरशी पुल बांधण्यात आला आहे. हा फरशी पुल बांधतांना निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाले असल्याने या पुलावर अनेक समस्या निर्माण होतात. तसेच पुलाची उंची कमी असल्याने थोडासाही पाऊस झाला तरी लगेचच नदीला पुर येतो व दोघ कोल्हे गावांचा संपर्क तुटतो तसेच पाचोरा ते संभाजीनगर जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर कायमस्वरूपी वर्दळ असते.
परंतु आता या रस्त्यावर कोल्हे गावाजवळ नांदोळ नदीवरील पुल कमकुवत झाला असून त्याला वारंवार खड्डे पडत आहेत. तसेच संरक्षण कठडे तुटले असल्याने रात्रीच्यावेळी तसेच नदीला पूर आल्यानंतर पुलाचा अंदाज कळत नसल्याने एखाद्यावेळी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून या ठिकाणी जास्त उंचीचा नव्याने पुल बांधण्यात यावा अशी मागणी कोल्हे व पंचक्रोशीतील गावातील गावकऱ्यांनी केली आहे.