दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/१२/२०२३

सद्यस्थितीत पाचोरा तालुक्यातील पुरवठा विभाग व महसूल विभागात सावळा गोंधळ सुरु असुन दररोज नवनवीन प्रकार समोर येत आहेत. पुरवठा विभागात नवीन रेशनकार्ड बनवून देण्यासाठी, रेशनकार्ड विभक्त करुन देण्यासाठी तसेच नाव कमी करणे नाव वाढवणे, बारा अंकी नंबर मिळवून घेण्यासाठी नको, नको क्लृप्त्या लढवल्या जात असून दलांलामार्फत आर्थिक देवाणघेवाण होत आहे.

असेच प्रकार महसूल विभागात सुरु असून सातबारा उताऱ्यावर नाव लावणे, पिक पेरा लावणे, वारसाच्या नोंदी करणे वारसाची नावे कमी करणे, नाव वाढवणे या कामांसाठी पैशांची मागणी केली जात आहे. व ‘जो देईल पैसा काम होईल तो सांगेल तैसा’ असा अनागोंदी प्रकार सुरु आहे. तसेच मुरुम, रेती, माती व इतर निसर्गसंपदेच्या लुटीतून अमाप पैसा मिळवून गलेलठ्ठ झालेल्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यापुढे जाऊन व्यक्ती जिवंत असतांना सातबारा उताऱ्यावर मयत असल्याची नोंद केल्याचे आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून महसूल विभागातील भोंगळ कारभाराचा इरसाल नमुना जनतेसमोर आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा शहरातील नामांकित कायदेतज्ञ ॲड. दिपक विठ्ठल पाटील यांच्या स्वमालकीचा पाचोरा शहरातील पुनगाव रस्त्यावर प्लॉट क्रमांक ९६/२/१३२ हा बक्कळ प्लॉट असून त्यांनी आज दिनांक ०५ डिसेंबर २०२३ मंगळवार रोजी या गटाचा ऑनलाईन सेंटरवर जाऊन उतारा काढला असता त्यांना उताऱ्यावर स्वता हयात असतांनाही स्वताच्याच नावाची नोंद मात्र मयत असल्याचे दिसून आले. ही नोंद पाहून कायदेतज्ञ ॲड. दिपक पाटील यांना धक्काच बसला थोडक्यात सांगायचे झाल्यास ‘याची देही याची डोळा पाहिला मी माझ्याच मृत्यूचा सोहळा’ असे म्हणण्याची वेळ कायदेतज्ञ ॲड. दिपक पाटील यांच्यावर आली आहे.

महसूल विभागाने कायदेतज्ञ ॲड. दिपक पाटील हे हयात असतांना सुध्दा यांची दिनांक २८ ऑगस्ट २०२० मध्येच मयत झाल्याची दप्तरी नोंद केली असल्याचे उघड झाले आहे. या चुकीच्या नोंदीने महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून वरीष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली असून कायदेतज्ञ ॲड. दिपक पाटील सारख्या सुशिक्षित व्यक्तीवर असा प्रसंग ओढवत असेल तर या महसूल विभागात सर्वसामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तसेच महसूल विभागात सुरु असलेल्या भोंगळ कारभाराचा विचार न केलेलाच बरा अश्या संतप्त प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. शासनाने जनतेच्या सोयीसाठी घंटो का काम मिंटो मे होण्यासाठी ऑनलाईन पध्दत अमलात आणली असली तरी प्रशासनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मगरुरी, मनमानी व हलगर्जीपणामुळे सर्वसामान्य जनतेला मनस्ताप सहन करावा लागत आहे.

********************************************************
‘दो आदमी, एक ही नाम’ गलतीसे हो गया ये गलत काम’
मंडल अधिकारी वरद वाडेकर यांचा खुलासा.
*********************************************************

या घडलेल्या प्रकाराबाबत मंडल अधिकारी वरद वाडेकर यांच्याशी संपर्क साधून खुलासा घेतला असता त्यांनी सांगितले की दिपक विठ्ठल पाटील या एकाच नावाच्या दोन व्यक्ती असल्याकारणाने तांत्रिक चुकीमुळे हा प्रकार घडला असल्याचे सांगितले. असे असले तरी कायदेतज्ञ ॲड. दिपक पाटील म्हणाले की हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरुपाचा असून महसूल प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे व हलगर्जीपणामुळे मला नहाकच मनस्थाप सहन करावा लागत असून आता उताऱ्यावर परत दुरुस्ती करुन घेण्यासाठी पायपीट करावी लागणार तसेच आर्थिक झळ बसणार असल्याने याप्रकरणी मी आता मा. जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.