दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/११/२०२३

सद्यस्थितीत निसर्गाचा लहरीपणा त्यातच शासनाचे शेतकऱ्यांविषयी नकारात्मक धोरण, संघटीत व्यापारी यामुळे शेतकरी शेतात राबराब, राबुनही शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नाही, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई व पिक विम्याच्या जाचक अटी, नियम व शर्ती मुळे शेतकऱ्यांना पिकव विम्याचा फायदा होत नसल्याने मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनाला उद्या दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ गुरुवार रोजी जळगाव जिल्ह्यात आक्रोश मोर्चा काढून सुरुवात केली जाणार असून या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून मदमस्त सरकारवर जळगावात जिल्ह्यात शेतकऱ्यांचा आसूड पडणार आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष शालिग्राम मालकर यांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जास्तीत, जास्त संख्येने उपस्थित राहून आक्रोश मोर्चात सामील होण्यासाठी आवाहन केले आहे.

प्रिय शेतकरी बांधवांनो, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे.एकीकडे शेतकऱ्यांचे उत्पन्न निम्म्यावर आलेले आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. एकीकडे संपूर्ण पावसाळ्यात पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाला तर दुसरीकडे थोडाफार हातातोंडाशी आलेला माल अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. एकीकडे शेतकऱ्यांवर आस्मानी संकट तर दुसरीकडे सुलतानी संकट अशा दुहेरी संकटात शेतकरी पुरता कोलमडला असून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची एवढी भयावह आणि भीषण परिस्थिती असतांनासुध्दा मदमस्त सरकार स्वतःच्या मस्तीत बेभान आहे. सत्ता टिकवण्यासाठी स्वतःची गणिते जुळविता येतात मात्र शेतकऱ्यांकडे पाहण्यासाठी या सरकारकडे वेळ नाही. तोडफोड करून बनलेल्या सरकारने शेतकऱ्यांना जरी वाऱ्यावर सोडले असेल तरी (राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी) मात्र शेतकऱ्यांच्या हक्कासाठी खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे.

प्रिय शेतकरी बांधवांनो,सध्याचे महाराष्ट्र सरकार अजगरासारखे सुस्त पडले आहे. झोपेचे सोंग घेतले आहे. शेतकऱ्यांकडे पाहायला यांना वेळ नाही. या बेशरम सरकारला जाग आणायची असेल तर यांना ‘कोपरापासून ते ढोपरापर्यँत’ आसुडाने सोलून काढावेच लागेल. आणि ते काम आपण म्हणजे ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने येणाऱ्या ३० नोव्हेंबर २०२३ गुरुवार रोजी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून हाती घेतले आहे.

म्हणून माझ्या प्रिय शेतकरी बांधवांनो येणाऱ्या ३० नोव्हेंबर २०२ रोजी जळगाव येथे दुपारी एक वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. जयवंत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान हे ध्येय मनात बाळगून
आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण जळगाव जिल्ह्या दुष्काळग्रस्त त्वरित जाहीर करावा, शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पीक विम्याची रक्कम जमा करावी, कापसासह व सर्व शेतमालाला योग्य भाव द्यावा, यासह असंख्य मागण्यांसाठी, सरकारला जाब विचारण्यासाठी जळगावं जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांनी जळगाव येथे होणाऱ्या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. शालिग्राम मालकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी आघाडी व जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केले आहे.