गाव एक समस्या अनेक (भाग १), वडगाव आंबे गावात अंधाराचे साम्राज्य

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०९/२०२२

वडगाव आंबे गावात मागील जवळपास तीन ते चार महिन्यांपासून पथदिवे बंद आहेत. यामुळे गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे संपूर्ण पावसाळा हा अंधरातच काढावा लागल्याने शेतकऱ्यांना खुपच समस्यांना सामोरे जावे लागले याबाबत काही ग्रामस्थांनी ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडे वारंवार मागणी करूनही आजपर्यंत गावातील विद्युत खांबावरील लाईट (पथदिवे) बसवण्यात आलेले नाहीत.

आता सद्यस्थितीत नवरात्रोत्सव सुरु असुन वडगाव आंबे गावात पाच मंडळांनी देवीची स्थापना केली असून चांगल्याप्रकारे आरास सजावट केली आहे. मात्र गावात विद्युत सहायक कायमस्वरूपी रहात नसल्याने वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे. तसेच ग्रामपंचायतीचे पथदिवे बंद असल्याने महिलांना रात्री देवीच्या दर्शनासाठी जातांना ठोकरा खात जावे लागत आहे. विशेष म्हणजे शेतकरी कुटुंबातील महिलांना या नवरात्रोत्सवात कुठेतरी दांडीया खेळणे, भक्तीगीते म्हणणे व विविध कार्यक्रमात सामील होऊन तेवढाच आनंद मिळवण्यासाठी एकमेव संधी असते परंतु गावात अंधाराचे साम्राज्य असल्याकारणाने महिला या नवरात्रोत्सवात सामील होऊ शकत नसल्याने त्यांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. म्हणून निदान दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना सोने देऊन भेटण्यासाठी तरी पथदिवे त्वरित सुरु करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे या गावात मागील चार वर्षांपासून अनेक समस्या असल्यावर ही मागील काळात थोडीफार विकासकामे करुन आजपर्यंत चालढकल करत ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजून घेत त्या सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नसल्याचा आरोप केला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या