पिंपळगाव हरेश्वर ग्रामीण रुग्णालयाचे खाजगीकरण झाल्याची चर्चा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०८/२०२३
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयाचे खाजगीकरण झाल्याची जोरदार चर्चा पिंपळगाव हरेश्वर परिसरात सुरु आहे. या चर्चेच्या अनुषंगाने सत्यजित न्यूज कडून सत्त्याता जाणून घेण्यासाठी दिनांक १८ ऑगस्ट २०२३ शुक्रवार रोजी थेट पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात भेट दिली असता या सुरु असलेल्या चर्चेत तथ्य आढळून आले परंतु या ग्रामीण रुग्णालयाचे खाजगीकरण झाले हा भ्रम असून या ठिकाणी मनमानी कारभार सुरु असून एक महिला डॉक्टर या ग्रामीण रुग्णालयातील खुर्चीवर बसून रुग्ण तपासणी व उपचार करत असल्याचे दिसून आले. याबाबत संबंधित महिला डॉक्टरांशी संवाद साधला असता त्या महिला डॉक्टरने कोणताही खुलासा न देता ग्रामीण रुग्णालयातून पळ काढला. परंतु तदनंतर याच ग्रामीण रुग्णालयात उपस्थित असलेल्या एका तरुणाने तुम्ही कोण ? तुम्हाला काय अधिकार आहेत ? असे प्रश्न विचारत तुम्ही दवाखान्यात फोटो का काढले ते सांगा असा प्रश्न उपस्थित करत हुज्जत घातली या तरुणाबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता संबंधित वाद घालणारा तरुण हा त्या महिला डॉक्टरांचा भाऊ होता अशी बाब समोर आली आहे.
म्हणून अधिक माहिती जाणून घेतली असता पिंपळगाव हरेश्वर ग्रामीण रुग्णालयात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची कायमस्वरूपी नेमणूक करण्यात आली आहे. संबंधित दोघ वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर) हे या ग्रामीण रुग्णालयाचे कामकाज सांभाळत आहेत. परंतु या दोघेही डॉक्टरांना कामानिमित्त तालुका किंवा जिल्हास्तरीय कार्यालयात गेले असल्याची माहिती समोर आली. असे असतांनाही पिंपळगाव हरेश्वर येथील एक महिला डॉक्टर ज्यांचा आरोग्य विभागाशी कवडीचाही संबंध नाही. विशेष म्हणजे ज्या महिला डॉक्टरांना ॲलोपॅथी औषधांबद्दल पुर्ण ज्ञान नाही तसेच ती वापरण्याचा अधिकार नाही तरीही या ठिकाणी रुग्ण तपासणी व उपचार करुत असल्याचे दिसून आले. तसेच या महिला डॉक्टर मागील काही महिन्यांपासून या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची तपासणी व उपचार करतांना दिसून येते असल्याकारणाने काही सुज्ञ नागरिकांच्या मनात याबाबत शंका निर्माण झाली व त्यांच्या मनात पिंपळगाव हरेश्वर ग्रामीण रुग्णालयाचे खाजगीकरण झाले की काय असा प्रश्न उपस्थित झाला होता.
*महत्वाचे*
पिंपळगाव हरेश्वर हे गाव जवळपास पंचवीस हजार लोकवस्तीचे गाव असून मोठी बाजारपेठ आहे. तसेच या गावाला जवळपास पंधरा खेडी लागुन असल्याने या सर्व गावांतील जनतेच्या आरोग्याची धुरा पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामीण रुग्णालवर अवलंबून आहे. मात्र मागील काही वर्षांपासून या ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टरांची नेमणूक केली जात नाही व डॉक्टरांची नेमणूक केली तरीही डॉक्टर कायमस्वरूपी याठिकाणी थांबत नसल्याने जवळपास विस गावातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याचा प्रश्न बिकट झाला आहे. तसेच आता नियुक्त करण्यात आलेले दोघेही डॉक्टर सद्यस्थितीत चांगली सेवा देत असल्याचे दिसून येत असले तरी या खाजगी महिला डॉक्टरला या ग्रामीण रुग्णालयात येऊन रुग्ण तपासणी व उपचार करण्यासाठीचा अधिकार कुणी दिला हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
(पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात नियुक्त असलेल्या डॉक्टरांना मागील काही महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.)