कंबरदुखी, पाठदुखी, अंगदुखीवर उपचार खास, भोजे ते पिंपळगाव हरेश्वर रस्त्यावरुन करा प्रवास.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०७/२०२३
रस्ते सुरक्षितता हा जीवन मरणाचा प्रश्न आहे असे मोठे फलक रस्त्याच्या बाजूला दिसून येतात. परंतु पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभागाने या त्यांच्या ब्रिदवाक्याकडे कमालीचे दुर्लक्ष केले असल्याने पाचोरा तालुक्यातील काही रस्ते वगळता इतर रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असल्यावरही या रस्त्यांचे नुतनीकरण किंवा डाग डुगी करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
कारण पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील सगळ्याच रस्त्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने कमालीचे दुर्लक्ष केले असून या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहे यामुळे एस. टी. व इतर वाहनातून किंवा स्वतःच्या वाहनातून प्रवास करतांना विशेष करून दुचाकीवरून प्रवास करतांना वाहनधारकांना रस्त्यावरील खड्डे चुकवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे व याच खड्डे चुकवण्याच्या नादात दररोज लहान मोठे अपघात होत असून काहींना अपंगत्व येत आहे.
अशीच परिस्थिती पाचोरा तालुक्यातील भोजे ते पिंपळगाव हरेश्वर रस्त्याची झाली असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच समजत नसून वाहन धारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर पडलेला मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांची मोडतोड होत असून या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना झटके खावे लागत असल्याने प्रवाशांना अंगदखीचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच दररोज लहानमोठे अपघात होऊन काही वाटसरूंना दवाखान्यात जाण्याची वेळ येत आहे. यामुळे (कंबरदुखी, पाठदुखी, अंगदुखीवर उपचार खास, भोजे ते पिंपळगाव हरेश्वर रस्त्यावरुन करा प्रवास.) असे सर्वसामान्य जनता व त्रस्त नागरिकांवर म्हणण्याची वेळ आली आहे.
येत्या आठ दिवसात या रस्त्याचे नुतनीकरण न झाल्यास सावखेडा, भोजे, चिंचपूरा येथील शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ रस्ता रोको आंदोलन करणार आहेत.