दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/१२/२०२२

पाचोरा येथील अखिल भारतीय मराठा महासंघ व महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा शहर व तालुका अंतर्गत जिजाऊ जन्मोत्सव स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक १४ जानेवारी २०२३ शनिवार रोजी पाचोरा येथे होणार आहे.

०३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती पासून ते १२ जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती, या दरम्यानचा कालावधी जिजाऊ जन्मोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. या जन्मोत्सवाचा एक भाग म्हणून पाचोरा तालुक्यात चित्रकला, एकपात्री प्रयोग, वक्तृत्व व निबंध स्पर्धा अश्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिजाऊ जन्मोत्सव स्पर्धा २०२३ मध्ये इयत्ता १ ली ते ४ थी या वर्गातील मुला मुलींसाठी स्वतंत्र गटात “निसर्ग चित्र” या विषयावर चित्रकला स्पर्धा, इयत्ता ५ वी ते ८ वी या वर्गाला फक्त मुलींसाठी “मी जिजाऊ बोलते” किंवा “मी सावित्री बोलते” या विषयावर एकपात्री प्रयोग, इयत्ता ९ वी व १० वी मधील मुला मुलींसाठी स्वतंत्र गटात “जिजाऊ नसत्या तर ? किंवा सावित्रीबाईंनी शाळा चालवली नसती तर ? या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आणि इयत्ता ११ वी व १२ वी या वर्गांसाठी “स्त्री कालची, आजची, आणि उद्याची किंवा २१ व्या शतकातील मुलं संस्कार या विषयावर मुला मुलींसाठी स्वतंत्र गटात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. सहभागी शाळांनी सर्व स्पर्धा आपापल्या शाळेत आयोजित करायच्या असून शाळा निहाय स्पर्धेतील पहिले तीन क्रमांक व संबंधित स्पर्धेतील लेखन साहित्याची मूळ प्रत किंवा वक्तृत्व आणि एकपात्री प्रयोगाची सॉफ्ट कॉपी आयोजकांकडे जमा करायची आहे. १४ जानेवारीच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी प्रत्येक शाळेतील व प्रत्येक स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व त्यामधूनच तालुकास्तरीय प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेत्यांचा मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

सहभागी शाळांनी प्रकल्प प्रमुख विनोद पाटील- ९९७०२०३६०३, प्रकल्प कार्यवाह चंद्रकांत पाटील ९३७०४१८३३४, प्रकल्प उपप्रमुख ज्ञानेश्वर पाटील- ९७३०३७८३५३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.