विद्यार्थिनींनी सतर्क व सक्षम होण्याची गरज: दिवाणी न्यायाधीश श्री. जी. बी. औंधकर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/१२/२०२२
“विद्यार्थिनी व महिलांवरील अन्यायाला न्याय देण्यासाठी कायदा व्यवस्था सक्षम आहे. अल्पवयीन मुलींना “गुड टच व बॅड टच” ची ओळख निश्चितच असायला हवी. जिथे जिथे आपल्या वर अन्याय, अत्याचार किंवा वाईट वागणूक होत असेल, तिथे तिथे मुलींनी वेळीच सतर्क राहण्याची गरज असून, तात्काळ विरोध करण्याची क्षमता मुलींमध्ये निर्माण व्हायला हवी”- असे प्रतिपादन पाचोरा येथील दिवाणी न्यायाधीश श्री. जी बी औंधकर यांनी पाचोरा येथे बोलतांना केले.
पाचोरा तालुका विधी सेवा समिती तर्फे येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक (मिठाबाई) कन्या विद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी अध्यक्षस्थानावरून दिवाणी न्यायाधीश जी.बी. औंधकर बोलत होते. या शिबिराला सह दिवाणी न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
न्यायाधीश महोदयांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून जनजागृती शिबिराचे उद्घाटन झाले. विद्यालयातर्फे प्राचार्य संजय पवार, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक पंडित कुंभार, आणि संस्थेचे विश्वस्त प्रा. रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. या शिबिरात ॲड संध्या साळुंके यांनी मानव अधिकार, ॲड मीना सोनवणे यांनी शाळा व महाविद्यालयातील पोस्को कायदा आणि ॲड मनीषा पवार यांनी विकलांग व्यक्तींचे अधिकाराचा कायदा- २०१६ या विषयावर विद्यार्थिनींचे प्रबोधन केले.
या कार्यक्रम प्रसंगी सह दिवाणी न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे यांचे समायोजित भाषण झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश जी.बी. औंधकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत दैनंदिन विश्वातील उदाहरणे देत मुलींचे प्रबोधन केले.
वकील संघाचे जेष्ठ सदस्य वकील सुनील पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका प्राध्यापिका प्रतिभा राठोड यांनी आभार प्रकटन केले.
या शिबिराला पाचोरा तालुका विधी सेवा समितीचे सदस्य ॲड एस. पी. पाटील, ॲड एस. बी. माहेश्वरी, ॲड -नोटरी संजीव नैनाव, ॲड- नोटरी योगेश पाटील, ॲड अनुराग काटकर, ॲड वसीम बागवान, ॲड अविनाश सुतार, ॲड लक्ष्मीकांत परदेशी, ॲड कविता मासरे- रायसाकडा, तालुका विधी सेवा समितीचे सहाय्यक दीपक तायडे, पोलीस कॉन्स्टेबल आबा पाटील उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी कन्या विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी इशस्तवन व स्वागत गीताचे गायन केले. प्राध्यापक शिवाजी शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने शिबिराची सांगता झाली.