दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/१०/२०२२

उद्या ग्रामविकास मंडळ पिंपळगाव हरेश्र्वर या संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. याकरिता सगळेच उमेदवार आपापल्या परीने मते मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सद्यस्थितीत मतं मिळवण्यासाठी कोण, कोण काय करतोय हा विषय तात्पुरता बाजूला ठेवून याच शाळेचे माजी विद्यार्थी प्रा.(डॅा) आर. आर. देशमुख कुलसचिव, ICT, मुंबई यांनी संस्थेच्या व विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आपल्या मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या बघुया कारण प्रा.(डॅा) आर. आर. देशमुख कुलसचिव, ICT, हे जरी आज मुंबईत असले तरी याच संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेत त्यांनी यश संपादन केले असल्याने आपण या समाजाचे व संस्थेचे काही देणं लागतो अशा सद्भावनेतून दिलेला संदेश व केलेले आवाहन त्यांच्याच शब्दातून सत्यजित न्यूजच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवत आहे.

*जाहीर आवाहन व नम्र विनंती*
ग्राम विकास मंडळाचे सदस्य मतदार बंधू बघिनी तसेच पिंपळगाव हरेश्र्वर व परिसरांतील ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी नागरिक यांस…
उद्या आपण आपल्या परिसरांतील मुलांचे भविष्य / भवितव्य ठरविणार आहोत. त्यामुळे कुठल्याही आमिषांना बळी पडू नये. आपणांस माहीत आहे की आपल्या ग्राम विकास विद्यालयाची ही निवडणूक दीर्घ कालावधी नंतर आता होत आहे.

मी स्वतः जरी मतदार नसलो तरी मी या संस्थेचा माजी विद्यार्थी व संस्थेचा हितचिंतक असून शैक्षणिक क्षेत्रात गेल्या २५ पेक्षा अधिक वर्षे कार्यरत आहे…. म्हणून मी आपणांस विनंती करतो की उच्च विद्याविभूषित तसेच शैक्षणिक क्षेत्रात ज्यांचे चांगले व पारदर्शक कार्य आहे अशाच उमेदवारांना निवडून द्या… कारण आपला चूकीचा निर्णय पुढील काही पिढ्यांना भोगावा लागू शकतो याची जाणीव ठेऊन योग्य उमेदवारांना निवडून द्या….

एखाद्या देशाचे भवितव्य नष्ट करायचे असेल तर ”त्या देशातील शिक्षण व्यवस्थेवर घाला घातला पाहिजे” असे म्हटले जाते …. यावरून आपणांस शिक्षणाचे व शिक्षण संस्थांचे महत्व कळेल. म्हणून शैक्षणिक संस्था योग्य, पात्र, लायक तसेच शैक्षणिक क्षेत्रांत ज्यांचे योगदान आहे अशांच्या ताब्यात दिल्या पाहिजेत … त्याशिवाय परिसराचा विकास शक्य नाही …. शिक्षक तसेच मुख्याध्यापक यांना कामाचे स्वातंत्र्य असले पाहिजे, त्यांच्या कामात हस्तक्षेप नको, विधायक व सुयोग्य मार्गदर्शन हवे, विद्यार्थी हित सर्वप्रथम असे मानणारी मंडळी संस्थेत असावी…..

लोकशाही मध्ये बऱ्याचदा आपण म्हणत असतो की आम्हाला योग्य पर्याय नाही परंतू आज आपणांस मतदानाचा सक्षम पर्याय दिलेला आहे जर आपण ह्या संधीचा योग्य वापर न करता तात्कालिक फायदा बघून मतदान केले तर नक्कीच येणारी पिढी आपणांस माफ करणार नाही त्यामुळे सद्सद् विवेक बुध्दीने मतदान करावे ही विनंती …..

सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता हे समीकरण मोडण्याची आज गरज आहे …. त्यासाठी पैसा घेऊन मतदान करू नका… निर्भीडपणे मतदान करा, लक्षात ठेवा की निवडणूकीत खर्च केलेला पैसा हा नंतर आपल्या कडूनच वेगळ्या मार्गाने वसूल केला जातो त्यामुळे कुठल्याही अमिषाला / प्रलोभनाला बळी न पडता सुसंस्कृत उमेदवारांनाच निवडून द्या व आपली शाळा योग्य नेतृत्वाच्या हाती सुपूर्त करा ही कळकळीची विनंती ….

प्रा.(डॅा) आर. आर. देशमुख
कुलसचिव, ICT, मुंबई