कुऱ्हाड येथे न्युमोनिया आजाराने हिरावून घेतला वंशाचा कुल दिपक .

सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~०७/०९/२०२२
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील रहिवासी श्री. सुनील सुभाष पाटील या़ंचा एकुलता, एक ११ वर्षाचा मुलगा वैभव याचे आज दिनांक ०७ सप्टेंबर २०२२ बुधवार रोजी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात न्युमोनिया आजाराने दुखद निधन झाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील शेतकरी श्री. सुनील सुभाष पाटील यांच्या एकुलत्या, एक वैभव या मुलाला सुमारे वीस दिवसापूर्वी सर्दी, खोकला, तापाची लक्षणे दिसू लागली होती. ही लक्षणे जाणवताच त्यांच्या कुटुंबियांनी त्याला अगोदर पाचोरा येथील दवाखान्यात उपचार करण्यासाठी नेले होते. परंतु डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करुन परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला जळगाव येथील दवाखान्यात पाठवण्यात आले होते.
काही दिवस घरीच व नंतर पाचोरा व जळगाव उपचार करुन घेत असतांनाच त्याला न्युमोनिया झाला असून परिस्थिती गंभीर असल्याकारणाने त्याला जळगाव येथून औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु पाचोरा, जळगाव ते औरंगाबाद असा उपचारासाठीच्या प्रवासात वीस दिवस निघून गेले होते. व यातच न्युमोनियाच्या आजाराने गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याने उपचाराच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे आज दिनांक ०७ सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी नऊ वाजता वैभवाची प्राणज्योत मालवली.
वैभवच्या निधनाची वार्ता कुऱ्हाड गावात माहीत पडताच कुऱ्हाड गावातील ग्रामस्थांनी वैभवाच्या घराजवळ एकच गर्दी केली होती. वैभव हा हसमुख, हजरजबाबी, हुशार व सगळ्यांचे काम ऐकणारा मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने हळहळ व्यक्त केली जात होती. गावावर एकाच शोककळा पसरली व गावात स्मशानशांतता पसरली होती. वैभववर आज सायंकाळी शोकमय वातावरणात कुऱ्हाड या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.