टक्केवारीच्या खेळात जबाबदार अधिकारी बिळात, गावागावांतील विकास कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०२/२०२३
एकाबाजूला खासदार, आमदार, जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गावातील सरपंच व इतर सत्ताधारी पदाधिकारी हे भविष्यात येणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून पाचोरा तालुक्यातील गावागावातून मेळावे घेऊन केलेल्या विकासकामांची यादी वाचून दाखवत जनतेतून टाळ्या मिळवून घेत असले तरी दुसरीकडे या झालेल्या व उर्वरित होणाऱ्या विकास कामांचा आढावा घेतल्यास बरेचसे ठेकेदार, संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची नावे काळ्या यादीत दिसतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु या भ्रष्टाचाराबाबत वारंवार तक्रारी करुनही संबंधित अधिकारी व कर्मचारी किंवा लोकप्रतिनिधी कोणताही खुलासा देत नसल्याने व तक्रारी करुनही कारवाई किंवा चौकशी होत नसल्याने सत्ताधारी, अधिकारी, कर्मचारी व ठेकेदारांची मिलीभगत असल्याने टक्केवारीच्या खेळात जबाबदार अधिकारी बिळात असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही व या भ्रष्टाचाराच्या साखळी पद्धतीबाबत सर्वसामान्य जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
या बाबत जर सत्य परिस्थितीवर सविस्तर बोलायचे झाल्यास पाचोरा तालुक्यासह शहरांसह सगळीकडे, खेड्यापाड्यात केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून इतर जिल्हा मार्ग, ग्रामसडक योजना, वाचनालय, दवाखाने, सार्वजनिक शौचालये, वैयक्तिक शौचालय, घरकुल योजना, अनुदानित विहीर, गोठा शेड, शेततळे, शेत रस्ते, गावागावातून सांडपाण्याच्या गटारी, अंतर्गत रस्ते, शाळा खोल्यांचे बांधकाम, सुरक्षा भिंत, अश्या एक ना अनेक योजना राबवून सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकार लाखो नव्हे तर करोडो रुपये खर्ची घालुन समृद्ध भारत बनवण्यासाठी सतत झटत आहेत.
(घर का भेदी लंका ढाय)
परंतु जनहितार्थ घेतलेल्या सरकारच्या या चांगल्या धोरणांचा व योजनांचा बट्ट्याबोळ होतांना दिसून येते आहे. या मागील एकमेव कारण म्हणजे सत्तेतील काही भ्रष्ठाचारी पदाधिकारी सोबतच त्यांच्या अखत्यारीत येणारे भ्रष्ठाचारी अधिकारी व कर्मचारी हेच आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. मागील काळात कुणीतरी म्हटलं होत की जनतेच्या हितासाठी दिल्लीतून निघालेला एक रुपया गल्लीपर्यंत येत येत फक्त एक पैसाच हातात पडतो ही शोकांतिका आहे.
(कार्यकर्ते बनले ठेकेदार विकास कामात भ्रष्ठाचार)
असाच काहीसा सावळा गोंधळ व कारभार पाचोरा तालुक्यातील विविध योजनांच्या माध्यमातून सुरु आहे. पाचोरा तालुक्यातील बऱ्याचशा राजकीय सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी आपापल्या कार्यकर्त्यांना मोठे करण्यासाठी विडा उचलला असून कार्यकर्त्यांना मोठे करण्याच्या नादात नियम व कायदे धाब्यावर बसवून ज्या कार्यकर्त्यांना एक इंच म्हणजे किती सेंटिमीटर, एक फुट म्हणजे किती इंच व एक मीटर म्हणजे किती फुट याचे गणित माहीत नाही अश्या कार्यकर्त्यांना ठेकेदारी पध्दतीने विविध योजनांच्या माध्यमातून येणाऱ्या विकास कामाचे ठेके देऊन काम उरकवून घेण्यासाठीचा सपाटा लावला आहे. ही विकासाची कामे करतांना अज्ञानी फक्त सयाजीराव ठेकेदारांच्या मजबुरीचा फायदा घेत संबंधित विभागाचे अधिकारी व इंजिनिअर आपापली टक्केवारी घेऊन संबंधित काम कश्याप्रकारे होत आहे, काम पूर्ण झाले किंवा नाही याची शहानिशा न करताच परस्पर (रोकडा मोजून घेत टक्के, एकदम ओके) अश्या पध्दतीने अहवाल तयार करून संबंधित कामांचा निधी, पैसा संबंधित ठेकेदाराला अदा करत आहे.
या भ्रष्ठाचारी साखळीने पाचोरा तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग, ग्रामसडक योजना, वाचनालय, दवाखाने, सार्वजनिक शौचालये, वैयक्तिक शौचालय, घरकुल योजना, अनुदानित विहीर, गोठा शेड, शेततळे, शेत रस्ते, गावागावातून सांडपाण्याच्या गटारी, अंतर्गत रस्ते, शाळा खोल्यांचे बांधकाम, सुरक्षा भिंत, अश्या एक ना अनेक योजना राबवून सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकार लाखो नव्हे तर करोडो रुपये खर्ची घालुन समृद्ध भारत बनवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा बोजवारा उडवलेला आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे.
जर का वरील कामांची इमानेइतबारे चौकशी झाली तर आपल्या पाचोरा तालुक्यातील बऱ्याचशा अनुदानित विहिरी, शेततळे, गोठा शेड, शेत रस्ते, वैयक्तिक शौचालय, सांडपाण्याच्या गटारी, शेकडो अनुदानित घरकुल चोरीला गेल्याचे पंचनामे करावे लागतील तसेच पाचोरा तालुक्यात गावोगावी देण्यात आलेल्या व्यायामशाळा, वाचनालय, आरोग्य केंद्र व विविध विकासकामांचे भिजत घोंगडे असल्यावर ही त्या कामांचे फक्त आणि फक्त कागदी घोडे नाचवून काम पूर्ण झाल्याचे दाखवत लाखो रुपयांची हेराफेरी केल्याची हजारो प्रकरणे उघडकीस येतील यात शंका नाही.