जामनेर सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार,रस्त्यापेक्षा उंच गटार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०९/२०२२
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी ते सोयगाव रस्त्यावर पावसाचे तसेच सांडपाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूंनी सार्वजनिक बांधकाम विभाग जामनेर तर्फे मागील तीन वर्षांपासून गटारीचे बांधकामास सुरुवात करण्यात आली आहे. परंतु या गटारीचे बांधकाम करतांना या परिसरातील भौगोलिक परिस्थितीचा कुठलाही आढावा न घेताच गटारीचे बांधकामास सुरुवात करण्यात आली असल्याने सुज्ञ नागरिकांनी या बांधकामाबाबत आक्षेप घेतला असून या गटारीच्या बांधकामाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे .
विशेष म्हणजे या गटारीचे बांधकाम करतांना अगोदर रसत्यापेक्षा तीन फूट कमी उंचीवर बांधण्यात आली होती. गटारीची उंची कमी असल्याने त्यात केर, कचरा, दगड, माती वाहून आल्यामुळे गटार तुडुंब भरल्याने पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता. ही बाब लक्षात आल्यावर या गटारीचे पुन्हा बांधकाम हाती घेण्यात आले व हे बांधकाम करतांना शेंदुर्णी ते सोयगाव या वहिवाटी रस्त्याच्या उंचीपेक्षा तीन फूट जास्त उंचीपर्यंत बांधकाम करण्यात आले आहे.
यामुळे परिसरातील पावसाचे व सांडपाणी वाहून जात नसल्याने या रस्त्यावर पाण्याचे मोठमोठे डबके साचले असून मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. यामुळे या परिसरात घाणीच्या साम्राज्यासह डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे तसेच दुर्गंधी पसरली आहे. या चिखलातून वाहन चालवणे मुश्किल झाले असून दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच सोयगाव रस्त्यावर वारंवार वाहतूक ठप्प होत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी जामनेर बांधकाम विभागाचे बांधकाम विभागाचे इंजिनिअर, संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी या गटारीच्या बांधकामांचे सर्व्हेक्षण करुन बांधकाम करावे व नागरीकांच्या अडचणी सोडवाव्यात अशी मागणी जोर धरत आहे.