लेखणीची धार व लोखंडाला आकार देत समाजसेवा करणारा अवलिया, सुनील लोहार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०७/२०२२
कुऱ्हाड खुर्द येथील समाजसेवक, लोकमतचे प्रतिनिधी व विशेष करुन लोखंडाला आकार व धार देत स्वताचे कुटुंब सांभाळून आपल्या लेखणीतून समाजभिमुख पत्रकारिता करत सर्वसामान्य जनतेच्या समस्यांना वाचा फोडून लेखणीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न तसेच समाजातील सांस्कृतिक, धार्मिक तसेच जनहितार्थ घडणाऱ्या घटनांचे वृत्तांकन करुन ते तळागाळातील जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणारे सुनील लोहार यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने सत्यजित न्यूज कडून दोन शब्दात त्यांचा अल्पसा परिचय.
सुनील लोहार हे मुलचे कुऱ्हाड येथील रहिवासी लोहार समाजात जन्मलेल्या सुनील लोहार यांचा वडिलोपार्जित लोहारी व्यवसाय म्हणजे
लोखंडापासून विळा, खुरपणी, केळी कापण्यासाठी लागणारी (दराती) कोयती, वखराची पास, तिफनीवर पेरणी करण्यासाठी लागणाऱ्या कुसल्या तसेच लोणच्याचा आंबा म्हणजे कैऱ्या फोडण्यासाठी लागणारा अडकित्ता, संसारपयोगी सांडस (पकड), माठ ठेवण्यासाठी लागणारी घडवंची, पावशी, अश्या विविध वस्तू
बनवण्याचे प्रशिक्षण वडीलांकडूनच शिकून त्या बनवणं व विकून आपल्या संसाराचा गाडा ओढत सोबतच आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हा सेवाभाव मनात ठेवून कधी लेखणीच्या माध्यमातून तर कधी पदरमोड करून समाजसेवा करणारा हा अवलिया त्यांचा आज रोजी वाढदिवस त्यानिमित्ताने सत्यजित न्यूज कडून दोन शब्दात त्यांचा अल्पसा परिचय.
सुनील लोहार यांचा जन्म कुऱ्हाड येथील घर ना दार ना शेती फक्त आणि फक्त वंशपरंपरागत लोहाराचा व्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या अत्यंत गरिबीची परिस्थिती असलेल्या एका लोहार कुटुंबात झाला. लहानपणी गावातीलच शाळेत शिक्षण घेत आयुष्याची सुरुवात झाली. जसजसं वय वाढत गेलं तसतशी घरातील परिस्थिती पाहून जबाबदारी वाढत गेली व सुनील लोहार ने ती जबाबदारी स्वीकारून चांगले शिक्षण करुन नोकरी करायची हे ध्येय उराशी बाळगून शाळा शिकत असतांनाच पाव (ब्रेड), मटकी विकून घरात दोन पैसे कमवून आणायचे स्वताचे व घर खर्चात हातभार लावायचा घर नसल्याने ग्रामपंचायतीच्या घरकुलात राहून दिवसामागून दिवस निघत गेले जसजसे वय वाढत गेल तसतशी जबाबदारी वाढत गेली घरात एक भाऊ, दोन बहिणी, आई, वडील असा परिवार पैकी एक बहिण अकरावीच्या वर्गात असतांना घरकाम करतांना विजेचा करंट लागून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
वडीलांच्या सोबत लोहारी काम करुन चांगले शिक्षण घेऊन नोकरी करायची हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सुनील लोहार यांनी बीकॉम पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. आता आपण नोकरी करायची या विचारात असतांनाच घरात असलेला लहान भाऊ अत्यंत मेहनती व हुशार तो सतत मला पोलीस व्हायचा हट्ट धरुन बसला होता त्याच्या शिक्षणासाठी आर्थिक बळ मिळावे म्हणून सुनील लोहार यांनी नोकरीच्या मागे न लागता वडीलांसोबत लोहार कामात हातभार लावत भावाला पोलीसात नोकरी करता यावी यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी खर्च करुन त्याला पोलीस दलात भरती करुन लहान भावाच स्वप्न पूर्ण केले.
नंतर लहानपणापासून वडिलांसोबत राहून लोखंडाला आकार देत त्यापासून शेतीपूरक व संसारपयोगी वस्तू बनवण्याची कला आत्मसात करुन आजही विळा, खुरपणी, केळी कापण्यासाठी लागणारी (दराती) कोयती, वखराची पास, तिफनीवर पेरणी करण्यासाठी लागणाऱ्या कुसल्या तसेच लोणच्याचा आंबा म्हणजे कैऱ्या फोडण्यासाठी लागणारा अडकित्ता, संसारपयोगी सांडस (पकड), माठ ठेवण्यासाठी लागणारी घडवंची, पालवी, अश्या विविध वस्तू बनवून विकण्याचा व्यवसाय करत. या वस्तूंची चांगली बनावट असल्याकारणाने मनमाड, नासिक, नांदगाव, येवला, श्रीरामपूर, धुळे, सावदा, रावेर, मलकापूर, बऱ्हाणपूर, मराठवाड्यापर्यंत नावलौकिक मिळविला असल्याने या ठिकाणाहून लोक शेती अवजारे व इतर वस्तू घेण्यासाठी येतात किंवा भ्रमणध्वनीचे माध्यमातून मागणी करतात.
हा व्यवसाय करत असतांनाच आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही व आपण समाजातील वंचित घटकांसाठी काहीतरी केले पाहिजे असा विचार करून लहानपणापासून वाचनाची व लिखाणाची आवड असल्याने व्यवसाय सांभाळून मागील आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कामाला सुरुवात केली. या क्षेत्रात काम करत असतांना समाजातील अनेक समस्या सोडविण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न व अडाणी लक्षात घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला.
हे करत असतांना दारुबंदी, व्यसनमुक्ती, शिक्षणाचे महत्त्व पटवून देत साक्षरता अभियान, गरजूंना शासकीय योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न, मागील काळात कोरोना सारख्या महामारीच्या संकटात सापडलेल्या कोरोनाग्रस्थ लोकांना मदत, समाजातील येणाऱ्या संकटात धावून जात भूकंपग्रस्थ, आगग्रस्त, महापुर, दवाखाना खर्च, अपघात अशा अनेक संकटात सामिल होऊन तन, मन, धनाने मदत करणे सामाजिक बांधिलकी व सर्वधर्मसमभाव राखुन धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित करणे, साक्षरता अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती अश्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन जनजागृती करणे हे उपक्रम राबलत आहेत.
आजही लोहारी व्यवसाय करुन आपला संसाराचा गाडा ओढत असतांनाच सोबत जमेल तशी समाजसेवा करत आहेत. परंतु आता मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरणात दिवसेंदिवस वेगवेगळे शोध लागत असून वेगवेगळी स्वयंचलित शेती अवजारे बाजारात उपलब्ध होत आहेत यात पिकांची काढणी, कापणी, मळणी हे काम हार्वस्टर व इतर स्वयंचलित यंत्रसामुग्रीने केले जात असल्याने तसेच घराघरात मिक्सरचा वापर होत असल्याने आता दिवसेंदिवस लोखंडापासून बनवलेल्या विळा, खुरपणी, केळी कापण्यासाठी लागणारी (दराती) कोयती, वखराची पास, तिफनीवर पेरणी करण्यासाठी लागणाऱ्या कुसल्या तसेच लोणच्याचा आंबा म्हणजे कैऱ्या फोडण्यासाठी लागणारा अडकित्ता, संसारपयोगी सांडस (पकड), माठ ठेवण्यासाठी लागणारी घडवंची, पावशी, अश्या विविध वस्तूची मागणी घटत चालली असल्याने भविष्यात आमचा व्यवसाय ठप्प होतो की काय अशी भिती सुनील लोहार यांनी बोलून दाखवत सरतेशेवटी या ओवी बोलून आपलं मत व्यक्त केले.
ऐरणीच्या देवा तुला, ठिणगी ठिणगी वाहू दे आभाळागत माया तुजी, आम्हांवरी हाऊ दे.