वडगाव आंबे ग्रामपंचायतीच्या निवडणक रिंगणात आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील व भाजपाचे ज्येष्ठ नेते मा. श्री. अमोल भाऊ शिंदे यांचे कार्यकर्ते आमनेसामने. भाग (२)
दिलीप जैन.(पचोरा)
दिनांक~१३/१०/२०२३
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे गृप ग्रामपंचायतीवर जानेवारी २०२३ पासून प्रशासकीय राजवट लागू आहे. आता नुकताच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणूकीसाठी १६ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर पर्यंत नामांकन पत्र दाखल करणे २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेपासून प्र. अ. छाननी तर २५ ऑक्टोंबर दुपारी तीन वाजेपर्यंत माघार घेणे, २५ ऑक्टोंबर दुपारी तीन वाजेपर्यंत निवडणूक चिन्हाचे वाटप व अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, ५ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेपासून ते साडेपाच वाजेपर्यंत मतदान, सहा नोव्हेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे. याप्रमाणे ग्राम पंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याचे तहसीलदार मा. श्री. यांनी जाहीर केले आहे.
या निवडणुकीत एकुण ११ सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात येणार असून या ११ सदस्यांपैकी लोकनियुक्त सरपंच म्हणून जनरल राखीव असून प्रभाग क्रमांक १ ते ४ मध्ये ११ सदस्यांची निवड घेण्यात येणार असून श्री. पी. यू. डहाके मंडळ अधिकारी हे कामकाज पहात आहेत.
हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून वडगाव आंबे गावातील राजकीय मंडळी कामाला लागली असून यात आजी, माजी, नवखे चेहरे समोर येत आहेत. आपापल्या पध्दतीने आपापल्या पॅनेलसाठी सरपंचपद राखीव असल्याने योग्य उमेदवाराची शोधाशोध सुरु करत इतर दहा सदस्यांची फळी उभी करण्यासाठी घराघरात, चावडीवर, मंदिराच्या पारावर तसेच आपली गुप्तगु बाहेर जाऊ नये ही खबरदारी घेत बैठका घेतल्या जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पाचोरा, भडगाव तालुक्याचे लाडके आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांचे खंदे समर्थक मा. श्री. संजय प्रभाकर पाटील यांच्या माध्यमातून व मार्गदर्शनाखाली डॉ. विकास पाटील, बबलू तडवी, तसेच भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते मा. श्री. अमोल भाऊ शिंदे यांचे खंदे समर्थक माजी ग्रामपंचायत सदस्य मा. श्री. मुकेश पाटील यांनीही या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उडी घेतली असून तेही सरपंच पदासाठी व इतर दहा सदस्यांची फळी उभी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याबाबत दोघेही पॅनल प्रमुखांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन आपल्या पॅनल मध्ये या निवडणुकीत कोण, कोण इच्छुक उमेदवार आहेत याबाबत विचारणा केली असता दोघेही पॅनल प्रमुखांनी आपले पत्ते झाकून ठेवत नावे उघड करण्यास बगल दिली आहे.
यामुळे ग्रामपंचायतीची ही निवडणूक जरी गावपातळीवरील असली तरी मात्र या निवडणुकीत तालुकास्तरावरील आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील व भाजपाचे ज्येष्ठ नेते मा. श्री. अमोल भाऊ शिंदे यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे चित्र सद्यस्थितीत दिसून येत असले तरी या निवडणुकीत उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी ह्याही भाग घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.