महानुभाव पंथीय वधु- वर परिचय पुस्तक ‘दैवयोग’चे विमोचन संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०२/२०२२
नाशिक : राज्यस्तरीय महानुभाव पंथीय वधु-वर परिचय पुस्तक ‘दैवयोग’चे विमोचन माजी मंत्री आमदार परिणय फुके यांच्या हस्ते श्रीकृष्ण मंदिरात करण्यात आले. यावेळी आचार्य प.पु.प. महंत न्यायंबास बाबा, प्रमोदजी काळबांडे, सामाजिक कार्यकर्ते हरिहर पांडे, सुधाकर मेंघर, अरविंद भाजीपाले, उदय नागपुरे, महंत मुरारीदादा बिडकर, चंदू फलके, पुरुषोत्तमजी ठाकरे, चंदू वैद्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार परिणय फुके म्हणाले, महानुभाव पंथात सर्व जातींची मंडळी आहेत. ‘दैवयोग’ समाजातील विवाहाच्या समस्या सोडविण्यास सहाय्य ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. व्यसनापासून दूर असलेल्या पंथात सर्व समाजातील वधू-वरांना एकत्र आणण्याचे कार्य होत राहील. या पुस्तकाचे वेगळेपण इतर समाजात वाखणल्या जावे, अशा शुभेच्छा आमदार परिणय फुके यांनी या पुस्तकाच्या विमोचन प्रसंगी दिल्या.
विविध जातीची मंडळी गुण्यागोविंदाने पंथात एकत्र नांदतात, त्यांना सामाजिक आणि आध्यात्मिक दृष्टीने समन्वय साधणारा सेतू म्हणून ‘दैवयोग’ने पुढाकार घ्यावा, असे मार्गदर्शन आचार्य प. पु. प. महंत न्यायंबासबाबा यांनी अध्यक्षीय भाषणात केले. तर प्रमोद काळबांडे शुभेच्छा देताना म्हणाले, महानुभाव पंथ किती विस्तीर्ण आहे, याची झलक पहिल्याच पुस्तकातून दिसून येते. पुर्वी काबुल- कंधारपर्यंत हा पंथ होता, आज उत्तर भारतात मोठ्या संख्येने उपदेशी मंडळी आहेत. त्यांनाही मोठा फायदा ‘दैवयोग’मुळे होईल. अशा पुस्तकांद्वारे समाज संघटीत राहील, असे व्यक्तव्य महंत मुरारीदादा बीडकर यांनी केले.
या कार्यक्रमाचे संचालन पुरुषोत्तम ठाकरे, प्रस्ताविक शुभम सुरकार यांनी केले तर आभार रत्नाकर पोतदार यांनी मानले. याप्रसंगी नाशिक जळगाव धुळे नागपुर नगर औरंगाबाद बुलढाणा ठिकाणाहून आलेले संत-महंत व भाविक उपस्थित होते.