
*वात्सल्य सिंधू*
कवी- अरुणाग्रज
भगिरथाची पुण्याई
गंगा धरणीवर आली.
पाप धुवून पाप्यांचे
माय अनाथाची झाली.
कोण जन्माची ढिलाई
आली होती वाट्याला.
बाळ जन्मा आल तिचं
सुन्या गायीच्या गोठ्याला.
दगडा खाली दगड
नाड तोडली बाळाची
गाय पाहून दायीन
झोप ऊडली काळाची.
जन्मदाता झाला वैरी
त्यानं फिरवली पाठ.
बाळ लाऊन पोटाले
धरली मरणाची वाट.
नको नको हिरकणी
जीऊ नको असा देऊ.
काळजाच्या तुकड्यात
तिचा आटकला जीऊ.
रेलवेच्या फलाटात
पोलिसाच्या काठीमधी.
तिनं जाणली वासना
कुंपणाच्या काटीमधी.
झाली राणी झाशीवाली
बाळ बांधलं पाठीले.
सांभाळाया पुण्यशिल
मग स्मशान गाठले.
नाही देव देवळात
माणसाच्या वस्तीवर
तुन्ह ओळखला सरग
मुरदयाच्या गस्तीवर.
दिला पोटाचा गोया
गरजूच्या वटी.
कयवयली हरीण
लावे अनाथाले पोटी.
नऊवारीचा कासोटा
आसा खोसला कसून.
भरे अनाथाच पोट
डोळ्या मधल्या आसून.
दाता देत गेले दान
सुटे चंद्राच गिऱ्हाणं
झाली अनाथाची माय
तव्हा टाळून मरण.
एक दोन तिन चार
जस भरल गोकुळ.
तव्हा तव्हा यशोदा
व्हय मनात व्याकुळ.
सारा मुलुख हिंडून
केली आटा-आटी
सात समदंर वलांडले
लेकराच्या भूकेसाठी.
नऊवारी लुगड्यात
केली पदराची वटी
फिरे विमानात घार
जशी चिला-पिलासाठी.
परदेशी माणसाले
मोठे नवलच वाटे.
भारताच भूषण
देशो-देशा मधी दाटे.
चिडी जाये दिगंतात
आने चोचीमधी दाना
तिच्या पाठी मागे तिचा
खोपा ऱ्हाये सुना सुना.
शिकवून केले मोठे
लायीसनी पाटीपोटी.
त्याच्या मधीच बांधल्या
साता जन्माच्या गाठी.
काही बाहेर ही दिले
बाहेरची ही आणले.
शिकीसनी लेकरांनी
तिचे उपकार जाणले.
अशी झिजली झिजली
जस लाकूड चंदन
वाळवंटी ऊभं केल
जस हिरव नंदन .
तिच्या किर्तीची नवायी
उच्च्या आभायात चढे.
असो कोणीही सरकार
टेके गुडघे तिच्यापुढे.
किती भेटले रावणं
किती भेटले रे कंस
बाई-माणूस म्हणून
नाही सुटू दिला हांस.
सासरच्या लोकांन
हाता-पाया धरुन
माफी मागीतली तिची
मोठा सत्कार करुन.
आहेवाच लेण भाळी
होत कपाय लेऊन.
म्हणे वागिन नाथाले
अनाथच म्हणून.
गाव वेशीवर येता
पाहे मागे फिरीसन
राम दिसता पाठीशी
डोये आले भरीसन.
ही त तुमची पुण्यायी
घरामधुन काढली.
कृपा तुमचीच मोठी
मही किरती वाढली.
नाही ऊना दुना शबूत
तोंडावाटे आणला.
कपाळाचा कुंकू
बाळ म्हणून जाणला.
बाई होती का देवी
बाप्पा होती तरी कोण
देवा का बरं चोरली
तुहीवाली आशिसन……
*माई सिंधूताईस शत् शत् बार प्रणाम…..*
कवी –
अरुणाग्रज (शिंदाडकर)
9527161626
📕✒️🙏🐜🌳🕊️