गव्हले ते शिंदाड रस्त्याच्या कामात खोळंबा, एका शेतकऱ्याने रस्त्यावर खोदली चारी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/१२/२०२१
पाचोरा तालुक्यातील गव्हले ते शिंदाड रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम नुकतेच सुरु करण्यात आले असून एका शेतकऱ्याच्या आडमुठे धोरणामुळे या रस्त्याच्या डांबरीकरण कामात खोळंबा आला असल्याने गव्हले ते शिंदाड या गावांचा संपर्क तुटला असून गव्हले येथील ग्रामस्थांना तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्या,येण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली असल्याने परिसरातील जनतेतून व गावागावातील जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील गव्हले हे गाव संपूर्ण तडवी बांधवांची वस्ती असलेले गाव आहे. हे गाव डोंगरी सातगाव ते शिंदाड रस्त्यावर वसलेले गाव आहे. या गावासाठी गव्हले ते शिंदाड या पाच किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी जिल्हा परिषद सदस्य मा.श्री. मधुकरभाऊ काटे यांनी विस लाखाचे जवळपास तसेच पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार आप्पासाहेब मा.श्री. किशोर पाटील यांनी विस लाखाचे जवळपास निधी उपलब्ध करुन दिला असून राजकारणात एकमेकांचे विरोधात असलेले तरी आपापल्या परिसरातील जनतेला सुखसुविधा मिळवून देण्यासाठी व विकासासाठी मात्र जुगलबंदी साधून काम करत असल्याचे एकमेव उत्कृष्ट उदाहरण दिसून येते.
गव्हले ते शिंदाड रस्त्याच्या डांबरीकरणासाठी जवळपास चाळीसलाख रुपये निधी उपलब्ध झाल्यामुळे या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी सुरवात झाली आहे. मात्र रस्त्याच्या कामाला सुरुवात होताच गव्हले येथील योगेश पाटील यांनी जेसीबीच्या साह्याने रस्त्यावर आडवी चारी खोदून रस्त्याच्या डांबरीकरणासाठी अडथळा निर्माण केला असून हा रस्ता माझ्या शेतातून जात असल्याने मी या रस्त्याचे डांबरीकरण करु देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
याबाबत गव्हले व शिंदाड परिसरातील जनतेशी संवाद साधला असता पंचक्रोशीतुन मिळालेली माहिती अशी की सातगाव डोंगरी, गव्हले शिंदाड हा रस्ता मागील साठ वर्षांपासून वहिवाटी असून काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले आहे. व आता याच रस्त्याचे डांबरीकरणासाठी निधी उपलब्ध झाला असल्याने डांबरीकरणासाठी सुरवात झाली आहे. मात्र संबंधीत शेतकऱ्याच्या मागील साठ वर्षांपासून वहिवाट असलेल्या रस्त्यावर त्याचा काहीएक संबंध नसतांना त्या शेतकऱ्याने आडदांड पणाने रस्त्यावर जेसीबीच्या साह्याने खोल व मोठी चारी खोदल्याने रस्त्याच्या डांबरीकरणासाठी अडथळा निर्माण झाला आहे.
तसेच गव्हले व सातगाव डोंगरी येथील ग्रामस्थांना तालुका व जिल्ह्याचे ठिकाणी जाण्या, येण्यासाठी हा सोयीचा रस्ता आहे. व याच रस्त्यावर खोल चारी खोदल्याने रहदारीचा खोळंबा झाला असून शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच दवाखान्यात व दैनंदिन कामासाठी बाहेरगावी जाणे बंद झाले आहे. म्हणून अश्या मनमानी करणाऱ्या इसमाच्या विरोधात लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करून गव्हले ते शिंदाड रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी पंचक्रोशीतुन होत असून या शेतकऱ्याच्या विरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.