भाकरीचा चंद्र शोधता, शोधता काळरात्र झाली. रेल्वेसेवा बंद असल्याने डोंगरगावच्या कामगारांचा हकनाक बळी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/११/२०२१
गेल्या वर्ष भरापासुन रेल्वेसेवा बंद असल्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या रोजंदारीवर जीवन जगणाऱ्या मजूर, कामगारांना खेड्यातून शहराकडे कामानिमित्त जाणे, येण्यासाठी अडचणी आहेत. परंतु सततचा लॉकडाऊन हाताला काम नाही घरात चिल्यापिलांचा दोन घासासाठीचा आक्रोश व इतर खर्च यासाठी दोन पैसे कमावणे गरजेचे म्हणून डोंगरगावच्या मजूरांनी एक खाजगी क्रुझर गाडी भाड्याने घेत दररोज कामावर जाण्यासाठी पर्याय निवडला मात्र हा क्रुझर गाडीचा प्रवास कामगारांच्या जीवावर उठला. अचानकपणे गाडीचा अपघात झाला व या अपघातात तिन मजूर जागेवर ठार झाले तर दहा मजूर जखमी झाले आहेत. जखमीत दोन मजूर गंभीर धुळे येथे रवाना झाले आहेत.
मनमाड येथील मालधक्क्यावर मजुरी चांगली मिळते या आशेपोटी पाचोरा तालुक्यातील अनेक कामगार कामासाठी रेल्वेने नियमितपणे अपडाउन करीत असत. कोरोना महामारीचे निमित्त पुढे करुन वर्षे भरापासुन रेल्वे प्रशासनाने रेल्वेसेवा बंद केल्याने गेल्या काही दिवसांपासून हे कामगार खाजगी क्रुझर गाडीत प्रवास करीत होते. आज दिनांक १ डीसेंबर बुधवार रोजी मनमाड येथुन क्रुझर गाडी क्रमांक एम एच १३ ए.सी. ५६०४ या गाडीतून प्रवास करीत असतांना सदर गाडीचा अपघात होवुन गाडीने पलटी झाल्याने या अपघातात तीन कामगार जागेवर ठार झाले तर तीन गंभीर जखमी झाले तर इतरही आठ जखमी झाले आहेत.
मयतात नाना उर्फ भाउलाल भास्कर कोळी (४०) विकास जलाल तडवी (२९) दोघे रा. डोंगरगाव तर एक मयत मुक्तार तडवी सार्वे प्रबो हे जागीच ठार झाले तर युनुस अल्लारखाँ तडवी, चंदन हरीश खाटीक, समाधान नारायण पाटील हे गंभीर जखमी असल्याने त्यांना धुळे येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर जवळपास आठ जणांना चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान मयतांची ओळख पटत नव्हती म्हणून पाचोरा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष मा.श्री. सचिन सोमवंशी यांनी तात्काळ डोंगरगाव सह इतरांना संपर्क करुन डोंगरगावचे गजानन पाटील, दिपक वाळके, भानुदास पाटील, गणेश पाटील, किरण पाटील, सुनील पाटील, धनराज पाटील, दत्तु पाटील यांना चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात तात्काळ पाठवले त्यांनी रुग्णालयात जाऊन मयतांची ओळख पटवली. तसेच युवक कॉंग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बापु सुभाष पाटील हा गाडी चालवत होता ही दुखद घटना माहित पडताच डोंगरगाव व पाचोरा तालुक्यात शोकमय वातावरणात तयार झाले होते. कारण रेल्वे व एस.टी.सेवा बंद असल्याने पाचोरा तालुक्यात दोन दिवसात वेगवेगळ्या अपघातात आठ जणांना जीव गमवावा लागला आहे.
कोरोना सारख्या मोठ्या संकटातून निघून लॉकडॉऊन शिथिल होऊन जवळपास सहा महीने झाले आहेत. संपूर्ण देशात मोर्चे, आंदोलने, सभा व दैनंदिन कामकाज सुरु झाले आहे. मात्र अजूनही रेल्वे प्रशासनाने प्रवासी रेल्वेसेवा सुरु केलेली नाही. त्यातल्या, त्यात रेल्वे प्रशासनाने जादा भाडे आकारणी करुन विषेश गाड्या सुरु केल्या आहेत. मात्र सामान्य तिकीट बंद केल्याने नियमितपणे प्रवास करणारे प्रवासी व पासधारकांना वंचित राहावे लागत आहे. जर सर्वसामान्य प्रवाशांसाठी ही सेवा सुरु असती तर आज पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव येथील कामगारांना जीव गमवावा लागला नसता अशी संतप्त प्रतिक्रिया कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी दिली असून केंद्रीय रेल्वे मंत्री यांना निवेदन देवुन तात्काळ रेल्वे ची जनरल व अपडाउन प्रवासी सेवा सुरू करण्याची मागणी करणार आहेत.