पाचोरा, भडगाव तालुक्यात लंम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम जोरात, मात्र मनुष्यबळ कमी असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०८/२०२३
जळगाव जिल्ह्यातील पाळीव जनावरांना लंम्पी आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवत असून बैल, गाय, म्हशीला या लंम्पी आजाराची लागण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन शासन, प्रशासनाने याची दखल घेत ज्या, ज्या भागात लंम्पी आजाराची लागण झाली आहे अश्या जिल्हा व तालुकास्तरावरील गुरांच्या बाजारावर बंदी घातली असून पशुसंवर्धन विभागामार्फत लंम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु केली आहे.
या लसीकरण मोहिमेत पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, ड्रेसर, परिचर व इतर कर्मचारी हे गावागावातून काही स्वयंसेवकांना सोबत घेऊन दिवस, रात्र ही लसीकरण मोहीम राबवत आहेत. काल पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द व बुद्रुक गावात सकाळपासून तर रात्री उशिरापर्यंत लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी कुऱ्हाड खुर्द येथील सरपंच डॉ. प्रदिप महाजन लोकमत प्रतिनिधी सुनील लोहार व ग्रामस्थांच्या सहकार्याने पशुधन विकास अधिकारी डॉ. गिरीश माळी, परिचर दीपक सावळे, डॉ. दिनेश राठोड, डॉ. जगदीश पाटील, डॉ. सौरव सावंत, डॉ. योगेश पाटील, भागवत पाटील यांनी घरोघरी, गोठ्यावर, खळ्यात तसेच शेतात जाऊन पाळीव प्राण्यांना लसीकरण केले. पाचोरा तालुक्यात ही लसीकरण मोहीम झपाट्याने राबविण्यात येत असून सकाळपासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येत आहे.
मनुष्यबळाअभावी पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ.
————————————————————-
पाचोरा तालुक्यात पशुवैद्यकीय अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक तसेच कर्मचारी संख्या कमालीची कमी असल्याकारणाने आहे त्या पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, परिचर व इतर कर्मचाऱ्यांची दमछाक होत असून लसीकरण करणे महत्त्वाचे असल्याने धावपळ करावी लागते आहे. यामागील माहिती जाणून घेतली असता पाचोरा तालुक्यात पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, ड्रेसर व परिचर यांची संख्या कमी असल्याकारणाने एका पशुधन विकास अधिकाऱ्यांना विस, विस खेड्यापाड्यातील कामकाज सोपवण्यात आले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.