पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी फसव्या वैद्यकीय बिलिंग पध्दतीने लाटला लाखोंचा मलिदा निलेश उभाळे यांनी केली उच्चस्तरीय चौकशीची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०४/२०२४
शाळा म्हटलं म्हणजे विद्येचे माहेरघर व शिक्षक म्हटलं म्हणजे समाजातील एक आदर्श व्यक्तिमत्व ज्याला विद्यार्थ्यांचा दुसरा पालक समजल जात अशा हा पवित्र पेशा घेऊन सरस्वतीच्या मंदिरात मुल घडवतांना त्यांना देशभक्ती, इमानदारी, परोपाराचे व शुध्द चारित्र्याचे धडे देणारे शिक्षकच जर शिक्षकी पेशाला न शोभणारे कृत्य करत असतील तर मग या समाजाने आपल्या भावी पिढीला घडवण्यासाठी कुणाकडे पहावे असा प्रश्न सहज मनात निर्माण होतो. आणि शिक्षकी पेशाला न शोभणारा असाच काहीसा प्रकार पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांच्या बाबतीत उघड झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास माध्यमिक विद्यालयातील काही शिक्षकांनी वैयक्तिक फायद्यासाठी ग्रामविकास माध्यमिक विद्यालयातील शिक्षक प्रशांत जगदेव मालकर नावाच्या दलाला मार्फत डॉक्टरांना हाताशी धरुन आरोग्य विम्याचा लाभ मिळवून घेण्यासाठी खोटी वैद्यकीय बिले बनवून कमीशन घेऊन या खोट्या बनावट बिलांची रक्कम शिक्षकांच्या खात्यावर जमा करुन मागील दहा वर्षात करोडो रुपयांची फसवणूक केली आहे. हा गैरप्रकार म्हणजे ही अनैतिक प्रथा केवळ सरकार आणि विमा पुरवठादाराचीच फसवणूक करत नाही तर आपल्या संपूर्ण आरोग्यसेवा प्रणालीच्या अखंडतेला सुध्दा खंडित करते ही बाब पाचोरा तालुक्यातील भोजे येथील अभियंता सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. निलेश उभाळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी उच्च स्तरीय समिती स्थापन करुन या झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करावी अशी मागणी राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
या निवेदनात त्यांनी ग्राम विकास माध्यमिक विद्यालय पिंपळगाव हरेश्वर येथे मागील दहा वर्षांपासून म्हणजे २०१३ पासून ते २०२४ आजपर्यंत कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांच्या वैद्यकीय बिलांच्या नोंदीचे पुनरावलोकन करणे, डॉक्टरांनी दिलेल्या खोट्या बिलाची जी. एस. टी. पेमेंट केलेले वैद्यकीय बिलांची सत्यता पडताळणे, या वैद्यकीय बिलांमधून मिळालेले उत्पन्न योग्यरित्या नोंदवले गेले आहे की नाही हे तपासण्यासाठी शिक्षकांच्या आयकर नोंदींची छाननी करणे, या फसव्या कृतीत सहभागी असलेल्या सर्व जबाबदार लोकसेवकांना ओळखण्यासाठी आणि त्यांना निलंबित करण्यासाठी विभागीय तपासणी करणे, १७% व्याजदरासह फसवणूक करून मिळवलेला निधी वसूल करणे आणि दोषींवर दंडात्मक कारवाई करुन दंड आकारणे, दलाल प्रशांत जगदेव मालकर आणि डॉक्टरांसह फसवणूक करणाऱ्या सर्व सहभागी होण्यासाठी दोषी आढळलेल्या सर्व व्यक्तींवर एफ आय. आर नोंदवून फौजदारी कार्यवाही सुरू करणे. अशी मागणी केली आहे.