जीव जाईल तर जाईल पण जिलेबीच खाईल, फुकटच्या एस. टी. प्रवासासाठी जेष्ठ नागरिकांची धडपड.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०५/२०२३
फुकट हा शब्द कानावर पडला म्हणजे सगळ्यांचे कान ताठ होतात व सगळेच आपल्याला फुकटच कस मिळेल याकरिता सगळेच वाट्टेल ते करायला तयार होतात. मग फुकटात मिळणाऱ्या योजना पदरात पाडून घेण्यासाठी आपण आण, बाण, शान विसरुन पाहिजे तेवढे खोटेनाटे कागदपत्रांची जुळवाजुळव करुन योजनेच्या ठिकाणी धक्काबुक्की, लोटालाट करुन आपल्या फुकटात मिळणार सवलती पदरात पाडून घेण्यासाठी धडपडत करत असतो. मग या सवलती मिळवून घेण्यासाठीच्या संघर्षात आपण आपल्या जीवाची ही पर्वा करत नाही म्हणून जीव “जाईल तर जाईल पण जिलेबीच खाईल” असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
असाच काहीसा प्रकार राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात एस. टी. तुन प्रवास करणाऱ्या जेष्ठ नागरिक म्हणजे ७५ वर्षे वयाच्या महिला व पुरुषांना शंभर टक्के १००% व लहान मुलींपासून तर ७५ वर्षे वयाच्या आतील महिलांसाठी पन्नास टक्के ५०% भाडे सवलत जाहीर केले आहे. ही प्रवासातील भाडे सवलत जाहीर झाल्यापासून (फुकटचा) प्रवास असल्याने एका बाजूला एस. टी. ने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या वाढली असून दुसरीकडे एस. टी. महामंडळ प्रवाशांना वेळेवर व पुरेश्या एस. टी. बसेस उपलब्ध करुन देण्यासाठी कमी पडत असल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे सद्यस्थितीत लग्नसराई व इतर दैनंदिन व्यवहार करण्यासाठी स्वखर्चाने प्रवास करुन जाणे या महागाईच्या काळात शक्य नसल्याने बऱ्याचशा प्रमाणात पुरुष मंडळींनी लग्नसमारंभ, दैनंदिन व्यवहार व इतर ठिकाणी जाणे टाळून घरातील महिलावर्ग व जेष्ठ नागरिकांवर जबाबदारी सोपवली असल्याने जास्तीत, जास्त महिला व जेष्ठ नागरिक एस. टी. तून प्रवास करत असल्याने प्रवासी संख्या कमालीची वाढली असून एस. टी. बसेस कमी पडत असल्याने व वेळेवर बसेस उपलब्ध होत नसल्याने जेष्ठ नागरिक व महिला, मुलींची तारांबळ उडत आहे.
प्रवास करणे गरजेचे असल्याने जो, तो आपल्या इच्छीत स्थळी जाण्यासाठी एस. टी. बस बसस्थानकात लागताच किंवा गावागावातील बसस्थानकाजवळ येताच प्रत्येक प्रवासी एस. टी. मध्ये बसण्यासाठी धडपड करतांना दिसून येत आहे. प्रवासी संख्या जास्त असल्याने व बसेस मध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात प्रवासी बसवले जात असल्याने काही प्रवासी गाडीत जागा मिळवण्यासाठी दरवाज्यातून तर काही प्रवासी खिडकीतून व संकटकालीन खिडकीतून प्रवेश मिळवण्यासाठी धडपड करतांना दिसतात. याच जागा मिळवण्यासाठी या चढाओढीत प्रवाशांची आपसात हातापायाची होत भांडणे होतांनाच्या घटना घडत आहेत.
यामुळे “जीव जाईल तर जाईल पण जिलेबीच खाईल” या एका जुन्या म्हणी प्रमाणे आज बरेचसे प्रवासी जीवघेणा प्रवास करतांना दिसत आहेत.