वडगाव आंबे ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांच्या विरोधात गटविकास अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/१०/२०२२
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे ग्रुप ग्रामपंचायत आहे. या ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत वडगाव आंबे, कोकडी तांडा व वडगाव जोगे या तीन गावांचा समावेश असून कोकडी तांडा व वडगाव जोगे ही गावे बंजारा समाजबांधवांची वस्ती असल्यामुळे या गावांना कोकडी तांडा व जोगे तांडा म्हणून ओळखले जाते.
या ग्रुप ग्रामपंचायतीवर मागील साडे चार वर्षापासून श्रीमती कलाबाई हरीभाऊ पाटील (शळके) या लोकनियुक्त सरपंचपदाचा कारभार सांभाळत आहेत. या सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर गावात बोटावर मोजण्याइतकी विकासकामे झाली यात शंका नाही. परंतु ही झालेली विकासकामे कश्या पध्दतीने झाली हे पाहाणे महत्वाचे आहे. विशेष म्हणजे कोणता निधी किती उपलब्ध झाला तो कुठे व कशासाठी वापरण्यात आला याबाबत सुज्ञ नागरिकांनी आक्षेप घेतला असून सत्ताधारी सरपंच व सदस्यांनी आपापल्या परीने कामे करुन घेतल्याचा ठपका सुज्ञ ग्रामस्थांनी केली आहे.
विशेष म्हणजे मागील दिड वर्षांपासून वडगाव आंबे ग्रामपंचायतीने जाहीर निवेदन (दवंडी) देऊन एकही ग्रामसभा घेतली नसल्याची तक्रार वडगाव आंबे येथील प्रमोद मिलींद भुसारे, जितेंद्र अमरसिंग पवार, ईश्वर वामन थोरात यांनी गटविकास अधिकारी पाचोरा यांच्याकडे दिनांक ०३ ऑक्टोबर २०२२ सोमवार रोजी लेखी स्वरूपात केली असून या निवेदनाच्या प्रती अधिक माहितीसाठी मा. जिल्हाधिकारी जळगाव व कार्यकारी अधिकारी जळगाव यांच्याकडे पाठवल्या असून ग्रामपंचायतीने त्वरित ग्रामसभा न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता तक्रारदारांच्या मते मागील दिड वर्षांपासून वडगाव आंबे ग्रुप ग्रामपंचायतीने एकही ग्रामसभा घेतलेली नसल्याने गावातील शेकडो समस्या सोडविण्यासाठी तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आम्हाला कुणाकडे दादा मागावी हा प्रश्न पडला असून गावात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढतच आहे. गावात मागील चार महिन्यांपासून पथदिवे बंद आहोत, महिल्यांच्या शौचालयाचा प्रश्न बिकट आहे. शालेय विद्यार्थ्यांना हवे असलेले दाखले, कागदपत्रे व ठराव वेळेवर मिळत नाहीत. ग्रामसेवक हे मुख्यालयात कायमस्वरूपी हजर रहात नसून कधीतरी ग्रामसेवकांची भेट झाल्यावर ते गरजुंच्या समस्या ऐकून घेत नाहीत व हवी असलेली कागदपत्रे किंवा माहिती मागितल्यास ते मासिक मिटिंगमध्ये या तेव्हा बघू अशी उत्तरे देत असल्याचे तक्ररदारांनी सांगितले.
तसेच तक्रारदारांच्या मते वडगाव आंबे ग्रामपंचायतीने मागील दिड वर्षांपासून एकही जगजाहीर ग्रामसभा घेतलेली नसून १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्ताने किंवा २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या वेळी जमलेल्या ग्रामस्थांच्या सह्यांचा वापर करुन ग्रामसभा घेतली असल्याचा खोटा बनाव केला असल्याचा आरोप करत याची चौकशी व्हावी व त्वरित जाहीर निवेदन (दवंडी) देऊन योग्यवेळी ग्रामसभा घेण्यासाठी भाग पाडावे अशी मागणी केली निवेदनाव्दारे मा. जिल्हाधिकारी, मा. गटविकास अधिकारी व मा. कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.