शेंदुर्णी, पाचोरा शहरासह जिल्ह्यात घरगुती गॅसचा काळाबाजार, घराघरातील गृहिणी बेजार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०८/२०२२
शेंदुर्णी शहरासह पाचोरा व जिल्ह्यात घरगुती गॅसचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असून एका बाजूला या स्वयंपाकाच्या गॅसचा वाहनांमध्ये इंधन म्हणून वापर होत असल्याने तर दुसरीकडे अधिकृत गॅस ग्राहकांना घरातील वापरासाठी लागणाऱ्या गॅस सिलेंडरची काळ्या बाजारात विक्री केली जात असून ह्या काळ्या बाजारात जाणाऱ्या गॅसवर हजारो स्वयंचलित वाहनांमध्ये वाहनधारक आपल्या वाहनात तसेच हॉटेल व्यवसायिक घरगुती गॅसचा सर्रासपणे वापर करत असल्याचे दिसून येत आहे.
एका बाजूला ऑनलाईन बुकींग करुन सुध्दा भारत व एच. पी. कंपनीच्या एजन्सी कडून वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नसल्याने गृहिणी हतबल झाल्या आहेत. कारण आजच्या परिस्थितीत रॉकेल मिळत नसल्याने स्वयंपाकघरात मोठी अडचण येत आहे. म्हणून गॅसचा काळाबाजार थांबवून आम्हाला वेळेवर सिलेंडर मिळावे अशी मागणी जिल्हाभरातून घराघरातील गृहिणी यांनी केली आहे.
(गॅस एजन्सी मालक व वितरकांची मनमानी घरपोच गॅसचे
*************************************
सिलेंडर पोहचवण्यासाठी अतिरिक्त पैशाची वसुली.)
***************************
संबंधित गॅस ग्राहकाने गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ऑनलाईन बुकींग केल्यानंतर ठराविक तासांच्या आत संबंधित वितरक कंपनीकडून घरपोच सिलेंडर पाठवून कंपनीने नेमून दिलेल्या कर्मच्याऱ्याने संबंधित ग्राहकांच्या घरी जाऊन स्वता सिलेंडर बसवून दिले पाहिजे हे सिलेंडर बसल्यावर शेगडी पेटवून कुठे गॅस गळती होत आहे का ? रबरी नळी सुरक्षित आहे का ? रेग्युलेटरची परिस्थिती काय आहे, रेग्युलेटर जवळ तसेच गॅसची चुल (शेगडी) याची व्यवस्थीत पाहाणी करणे बंधनकारक आहे. तसेच शासनमान्य दरात घरपोच सिलेंडर पुरवणे बंधनकारक असल्यावर ही संबंधित गॅस वितरक हे पन्नास ते सत्तर रुपये जास्तीचे घेत आहेत. याबाबत पुरवठा विभागाकडून कारवाई अपेक्षित आहे.
(घरगुती गॅसचा वाहनात व हॉटेल तसेच वर्दळीच्या ठिकाणी भर
*************************************** चौकातील चहाच्या दुकानात वापर धोकादायक)
******************************
घरगुती गॅसचा वाहनांमध्ये वापर होत असून हा प्रकार धोकादायक आहे. कारण हा स्वयंपाकाचा गॅस तरल (हलका) व ज्वलनशील व असल्याने हा मोकळ्या हवेत लगेचच पेट घेत असल्याने आतापर्यंत बरीचशी वाहने या गॅसच्या वापरामुळे आगीत भस्मसात झाली असून बऱ्याचशा निष्पापांचा बळी गेला आहे. तसेच भरचौकातील व्यवसायिक दुकानातून सुध्दा गॅसचा स्फोट झाल्याच्या घडलेल्या आहेत. म्हणून शासनाने या घरगुती गॅसचा वाहनांमध्ये वापर करण्यावर बंदी घातली असून या ऐवजी सी. एन. जी. गॅस पंप उपलब्ध करून दिलेले आहेत. मात्र सि. एन. जी. गॅस महाग व कमी मायलेज देते व स्वयंपाकाचा गॅस कुठेही उपलब्ध होतो. कमी खर्चात जास्तीत, जास्त किलोमीटर पर्यंत प्रवास करुन पैशाच्या बचतीसह जास्तीचे भाडे खिशात पडत असल्याने व ठिकठिकाणी अनाधिकृतपणे गॅस भरुन देणारे काही लोक शहरासह ग्रामीण भागातील गावागावातून वाहनधारकांना गॅस भरुन देत आहेत. म्हणून संबंधित विभागाकडून या अवैधरित्या गॅस भरुन देणारांवर व वाहनधारकांवर कडक कारवाई करावी म्हणजे स्वयंपाकाच्या गॅसचा काळाबाजार थांबेल व स्फोट होणे व इतर अपघात कमी होतील असे मत व्यक्त केले आहे.