पहूर येथे बायोडिझेलची विक्री संशयाच्या भोवऱ्यात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०७/२०२२
जामनेर तालुक्यातील पहूर येथे पहूर ते वाकोद दरम्यान तोल काट्याजवळ एका इमारतीवर उत्पादक मेज, ग्रीट, मका, चुणी, असे नाव दिसत असलेतरी या ठिकाणी मात्र सद्यस्थितीत बायोडिझेलची विक्री होत असल्याने सर्वसामान्य जनतेतून तसेच सुज्ञ नागरिकांतून कुतुहल निर्माण झाले आहे. खरा प्रकार नेमका काय आहे असा प्रश्न उपस्थित करत या बायोडिझेलच्या विक्री बाबत सखोल चौकशी होऊन याठिकाणी विकले जाणारे बायोडिझेल चे हे विक्री केंद्र अधिकृत आहे किंवा अनाधिकृत यांचा सोक्षमोक्ष करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.
जर याठिकाणी बायोडिझेल विक्रीसाठी अधिकृत मान्यता मिळाली असेल तर उत्पादक मेज, ग्रीट, मका, चुणी असे नाव दिसत आहे ते बदलवून बायोडिझेल विक्रीसाठी ज्या नावाने रितसर परवानगी घेतली असेल ते नाव लिहून परवाना म्हणजे लायसन क्रमांक, नंबर, विक्री परवाना व विक्रेत्याचे नाव बायोडिझेल विक्रीसाठी लागणरी जनहितार्थ माहिती व दरपत्रक लावून बायोडिझेलची विक्री करण्यात यावी व असा कोणताही परवना किंवा अधिकृत मान्यता नसल्यास संबंधित बायोडिझेल विक्री केंद्रावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
या सविस्तर वृत्त असे की पहूर हे गाव जळगाव, संभाजीनगर (मराठवाडा), इंदौर (मध्यप्रदेश), मुंबई, नागपूर महामार्गावर वसलेले मोठ्या बाजरपेठेचे गाव आहे. यामुळे पहूर गावावरुन मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक व मालवाहतूक करणाऱ्या अवजड तसेच लहानमोठ्या वाहानांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरु असते विशेष म्हणजे पहूर येथील भौगोलिक परिस्थिती विस्तारीत असल्याकारणाने लांब, लांबून हजारो किलोमीटरचा प्रवास करुन आलेल्या वाहनधारकांना याठिकाणी आपापली वाहने उभी करण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध असल्याकारणाने ते प्रवासादरम्यान थकवा काढण्यासाठी तसेच सतत चालणाऱ्या वाहनांची देखभाल दुरुस्ती व इंधन भरण्यासाठी तसेच जेवण करण्यासाठी दररोज शेकडो वाहनधारक पहूर येथे थांबत असतात.
याचाच फायदा घेत येणाऱ्या, जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्याने काही व्यवसायीकांनी पहूर ते संभाजीनगर, पहूर ते जळगाव, पहूर ते जामनेर व पहूर ते पाचोरा रस्त्यावर ठिकठिकाणी इंधन भरण्यासाठी पेट्रोल व डिझेल पंप उभारले आहेत. हे अधिकृत परवाना धारक पेट्रोल व डिझेल शासनाच्या अटी नियमांचे काटेकोर पालन करुन आपला व्यवसाय सांभाळत शासनाला दररोज हजारो रुपयांचा कर भरत आहेत.
परंतु दुसरीकडे याच परिसरात उत्पादक मेज ग्रीट मका चुणी असे नाव असलेल्या एका इमारतीत एका बाजूला इंधन भरलेला टॅंकर उभा करुन त्यातून पाईपव्दारे इंधन काढून ते वाहनधारकांना विकत असल्याचा गोरखधंदा मागील काही दिवसांपासून सुरु असल्याने हे बायोडिझेल दहा ते पंधरा रुपयांनी स्वस्त असल्याकारणाने अधिकृत पेट्रोल व डिझेल पंपाचा इंधन विक्रीचा खप कमी झाला असल्याने त्यांना अनेक अडीअडचणीला सामोरे जावे लागत असल्याचे खात्रीलायक वृत्त सत्यजित न्यूजकडे प्राप्त झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता वरील ठिकाणी सुरु असलेली बायोडिझेल विक्री ही अनाधिकृत असल्याचे बोलले जात असून याबाबत जनमानसातून तर्कवितर्कांना उधाण आले असून संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या बायोडिझेल विक्रीबाबत सविस्तर तपास करुन संबंधितांकडे बायोडिझेल विक्रीबाबत परवान असेल तर ठीक नसेल तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.