पिंपळगाव हरेश्वर येथील कापूस व्यापाऱ्याकडून मापात पाप, कापूस उत्पादकहो सावधान.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०३/२०२२
आज दिनांक १० मार्च २०२२ गुरुवार रोजी पिंपळगाव हरेश्वर येथील राजु रामदास मराठे हा कापूस व्यापारी अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथे कापूस खरेदीसाठी आलेला होता. म्हणून तांड्यातील शेतकऱ्यांनी आपला कापूस त्या व्यापाऱ्याकडे विक्री करण्यासाठी घेऊन गेले असता कापसाचे मोजमाप करतांना संबंधित कापूस व्यापाऱ्याच्या वजन काट्यात फरक असल्याचा संशय आल्यावर तांड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी घड्याळी काट्यावर २० किलो वजनाचे प्रमाणीत माप मोजून व तपासून पाहिला असता प्रती २० किलो वजनामागे एक ते दिड किलो वजनाची तफावत आढळून आली आहे.
संबंधित व्यापारी हा मागील काही वर्षापासून वरसाडे तांडा नंबर १, २, ३, ४ या तांड्यासह डांभुर्णी, पिंप्री, कोल्हे, अंबे वडगाव, अंबे वडगाव खुर्द, अंबे वडगाव बुद्रुक व आसपासच्या इतर लहानमोठ्या गावात कापूस खरेदीसाठी फिरुन कापसाची खरेदी करत असतो. परंतु त्याच्या घड्याळी काट्यामध्ये एक ते दिड किलो वजनाची तफावत आढळून आली असल्याने तसेच या घड्याळी काट्याजवळ एक फिरकी असून या फिरकीचा वापर करून परिस्थिती व कापसाचे वजन पाहून हा व्यापारी हेराफेरी करुन (मापात पाप) कमी वजनमाप दाखवून प्रती क्विंटल मागे आठ ते पंधरा किलो कापसाची हेराफेरी करत शेतकऱ्यांची लुट करत असल्याचे शेतकरी सांगतात.
संबंधीत व्यापाऱ्याची लबाडी व चोरी उघड झाल्यावर अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील शेतकऱ्यांनी कापूस व्यापाऱ्याला घेराव घालून संबधीत काटा खोटा असल्याचे सिद्ध करुन देत पाच, पंचां समोर माफी मागायला लाऊन यापुढे आमच्या गावात येऊ नको अशी तंबी देत त्याला हाकलून लावले असल्याचे खात्रीपूर्वक समजते.
सुचना~ मापात पाप करुन कापूस व्यवसाय करणारी एक टोळीच पाचोरा तालुक्यात सक्रिय असून हे कापूस व्यापारी गावागावात जाऊन घड्याळी वजन काटा वापरुन या काट्याला असलेल्या फिरकीचा गैरवापर करत कष्टकरी शेतकऱ्यांची लुट करत आहेत. म्हणून अश्या कापूस व्यापाऱ्यांना गावबंदी करुन पायबंद घालावा अशी सुचना सुज्ञ नागरिक व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे.