मर्जीतले ठेकेदार आणि वाहनधारक बेजार, वरखेडी ते शेंदुर्णी रस्ता बनला मृत्यूचा सापळा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०१/२०२२
महामार्ग क्रमांक १९ वर पाचोरा ते जामनेर रस्त्यावर वरखेडी ते शेंदुर्णी दरम्यान रस्त्याची चाळण झाली असून, मागील सहा महिण्यापासून रस्त्यावरील डांबर नाहिसे झाले असून रस्त्यावर खड्डे की खड्यात रस्ता असा प्रश्न वाहनधारक व सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.
पाचोरा ते जामनेर रस्त्यावर वरखेडी ते शेंदुर्णी दरम्यान रस्त्याची चाळण झाली असून या रस्त्यावरून वाहन चालवणे म्हणजे मौत का कुंवा सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या रस्त्याचे नुतनीकरणासाठी वारंवार आवाज उठवण्यात आला मात्र नुतनीकरणासाठी त्वरित उपाययोजना केल्या जात नाही. मागील सहा महिन्यापासून या रस्त्यावर बरेचसे अपघात झाले असून, काही वाहनधारकांना अपंगत्व आले आहे. तर काहींना आपला जीव वाचवण्यासाठी दवाखान्यात हजारो रुपये खर्च करावा लागला आहे.
असाच प्रकार अंबे वडगाव येथील भाटीचा पुल ते गावापर्यंतचा रस्ता खड्डेमय झाला असून महानुभाव आश्रमाचे जवळच एका मोरीवर जवळपास चार फुट खोल खड्डा पडलेला आहे. हा खड्डा बुजवण्यासाठ अंबे वडगाव ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभाग पाचोरा यांच्याकडे वारंवार लेखी व तोंडी सुचना (तक्रार) देऊनही पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभाग चालढकल करत असल्याचा आरोप जनतेतून केला जात आहे.
तसेच या रस्त्याचे नुतनीकरणासाठी निधी मंजूर झाला असून या रस्त्याचे नुतनीकरणासाठी ठेकेदाराने मागील महिन्यापासून रस्त्याच्या दुतर्फा खडीचे ढीग टाकून ठेवले आहेत. रस्त्यावर असलेले खड्डे व रस्त्याच्या दुतर्फा खडीचे ढीग असल्याने या रस्त्यावर वाहने चालवणे मुश्कील झाले असून खड्ड्यांमुळे वाहनांची मोडतोड होत आहे. तसेच आजपर्यंत बरेचसे अपघात झाले आहेत व अपघातांची मालिका सुरुच असल्याने तसेच रस्त्याच्या नुतनीकरणासाठी सुरुवात होत नसल्याने अंबे वडगाव ग्रामस्थांनी दिनांक ०२ जानेवारी २०२२ रविवार रोजी अंबे वडगाव जवळच असलेल्या रस्त्यावरील खड्ड्यात काळा झेंडा लाऊन गुलालाने खड्ड्याचे पुजन करुन नारळ फोडत सार्वजनिक बांधकाम विभाग पाचोरा यांचा निषेध नोंदवला आहे.
(मर्जीतले ठेकेदार असल्याने नुतनीकरणासाठी दिरंगाई.)
वरखेडी ते अंबे वडगाव रस्त्याच्या नुतनीकरणासाठी ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे. हे ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांची जुगलबंदी असल्याकारणाने या रस्त्याच्या नुतनीकरणासाठी उशिर होत असल्याचे बोलले जाते. कारण गावातील बऱ्याचशा लोकांनी पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनिअर मा.श्री. यांना रस्त्याच्या नुतनीकरणासाठी कधी सुरुवात होईल कशी विचारणा केल्यानंतर समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा अनुभव येत असून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने आजरोजी ग्रामस्थांनी खड्डा पुजन करुन आपला रोष व्यक्त केला आहे.
याप्रसंगी श्री.विनायक शळके, कायदेतज्ज्ञ श्री.मंगेशराव गायकवाड, श्री. पितांबर सपकाळे, श्री.भास्कर शिंदे, श्री.संतोष पाटील (प्रहार), श्री.संजय पाटील. श्री.रवींद्र महाजन, श्री. कौतीक पाटील, श्री.शरद देवरे, श्री. भास्कर गायकवाड, श्री.भिला पाटील, श्री.मधुकर मराठे, श्री.ज्ञानेश्वर वाघ, श्री.सोनु सपकाळे व असंख्य ग्रामस्थ हजार होते.