कुऱ्हाड तांडा येथील रेशन दुकानदाराची मनमानी, रेशनकार्ड धारकांच्या डोळ्यात पाणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/१२/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील शासनमान्य स्वस्त धान्य दुकानदार हे मनमानी करुन आपल्या मर्जीप्रमाणे वागत असून रेशनकार्ड धारकांना शासनाच्या नियम व अटी नुसार धान्य देत नसल्याची तक्रार कुऱ्हाड तांडा येथील काही ग्रामस्थांनी पुरवठा अधिकारी पाचोरा यांच्याकडे केल्यावरही त्या तक्रारीचा काहीएक फायदा होत नसल्याने कुऱ्हाड ग्रामस्थांनी प्रसारमाध्ययमांकडे धाव घेत सत्य परिस्थिती कथन केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा या गावासाठीचे स्वस्त धान्य दुकान हे रामदेव बाबा महिला बचत गटाच्या नावाने घेण्यात आलेले आहे. मात्र हे स्वस्त धान्य दुकान कुऱ्हाड तांड्यातील एक व्यक्ती चालवत असून ही व्यक्ती स्वस्त धान्याचे वाटप करतांना शासनाचे अटी व नियम धाब्यावर बसवून मनमानी करत असल्याचा आरोप करत दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ रोजी पाचोरा पुरवठा विभागाकडे तक्रारी अर्ज दिला असून या तक्रारी अर्जावर अशोक तवर, सिताराम लखीचंद राठोड, गोबा रामदास वंजारी, श्रीराम सिताराम तवर, सुभाष तवर, अण्णा बल्लु चव्हाण, उत्तम पिरा वंजारी, दामू देशमुख वंजारी, अर्जुन पुनमचंद राठोड, संभाजी नाना राठोड, गोविंदा किसन वंजारी, साहेबराव सुरेश पवार व इत्यादी ग्रामस्थांची स्वाक्षरी आहे.
या तक्रारी निवेदनात संबंधीत रेशन दुकानदार यांनी २६ नोव्हेंबर २०२१ च्या महिन्याचे केंद्र सरकारने विनामूल्य दिलेले गहू, तांदूळ हे धान्य वाटप केले नसल्याने जवळपास १००, ११० लाभार्थी धान्य मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. म्हणून या गैरप्रकाराची तातडीने चौकशी होऊन लाभार्थींना नोव्हेंबर महिन्यात न मिळालेले धान्य त्वरीत वाटप करावे अशी मागणी केली आहे.
तसेच संबंधित रेशन दुकानदार हे मोफतचे धान्य वाटप करतांना प्रत्येक लाभार्थीकडून प्रत्येकी वीस रुपये प्रति महिन्याला घेत असतो. तसेच धान्य वाटप करतांना वजन, माप व्यवस्थित करत नसल्याचा आरोप केला असून धान्य कमी मिळत असल्याचे तक्रारी अर्जात म्हटले आहे. तरी २९ नोव्हेंबर २०२१ रोजी दिलेल्या अर्जाची दखल घेऊन कुऱ्हाड तांडा येथील स्वस्त धान्य दुकानदाराची सखोल चौकशी करून शासनामार्फत आम्हाला मिळणारे हक्काचे धान्य शासनाचे नियम व अटी प्रमाणे पुरेपूर मिळावे व संबंधित दुकानदाराची चौकशी व्हावी अशी मागणी या तक्रार अर्जात केली असून सदरचा अर्ज पाचोरा पुरवठा विभागाकडे दिला असल्याची झेरॉक्स प्रत प्रसारमाध्ययमांकडे दिली आहे.
(पाचोरा तालुक्यात अशीच बरीचशी स्व स्त धान्य दुकाने नामधारी एक तर दुकान चालक दुसरा असल्याचे दिसून येते. तसेच गावागावातून बऱ्याचशा स्वस्त धान्य दुकानाबाबत तक्रारी आहेत. म्हणून अश्या सर्व दुकानांची चौकशी होणे गरजेचे आहे. परंतु हमाम मे सब नं** असा प्रकार सुरु असल्याने तक्रारी अर्जाची चौकशी होत नसल्याचे जनमानसातून बोलले जात आहे.)