लोहारी ते वरखेडी दरम्यान रस्ता नुतनीकरणाचे काम संथगतीने सुरु, ग्रामस्थ, वाहनधारक व वाटसरु त्रस्त.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/११/२०२१
पाचोरा ते जामनेर रस्त्यावर पाचोरा शहरापासून वरखेडी तसेच वरखेडी येथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मानमोडी परिसरापर्यंतचा डांबरीकरण रस्ता यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे अतिशय खराब झाला होता. डांबरीकरण उखडल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. या खराब रस्त्यावर अपघाताची मालिका सुरु झाली होती. ही बाब लक्षात घेऊन व जनतेच्या मागणीनुसार आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांनी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून पाचोरा ते वरखेडी पहूर राज्य मार्ग क्रमांक १९ चे नुतनीकरणाचे काम सुरु केले असून यात १९२/०० ते १९३/२०० किलोमीटर मधील अंतर पूर हानी दुरुस्ती अंतर्गत करणेसाठी माननीय आमदार श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते मागील महिन्यात उद्घाटन करण्यात आले आहे.
परंतु मागील महिन्यापासून या रस्त्याचे काम सुरू झाले असले तरी लोहारी ते वरखेडी दरम्यान होत असलेले काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. तसेच काहींच्या मते हे काम व्यवस्थित होत नसल्याची ओरड आहे.
तर दुसरीकडे वरखेडी बस स्थानक ते भोकरी जवळ असलेल्या पी.जे. रेल्वे फाटकापर्यंतचे काम अजूनही सुरू करण्यात आलेली नाही. रस्त्याचे नूतनीकरणासाठी वरखेडी बस स्थानक ते रेल्वे फाटकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा खडीचे मोठमोठे ढीग टाकले असून काम सुरु नसल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे वरखेडी बसस्थानक परिसरात आसपासच्या दहा खेड्यातील प्रवासी जामनेर, जळगाव, पाचोरा व इतर मोठ्या शहराकडे जाण्यासाठी येथे येऊन थांबतात परंतु रस्त्याच्या नुतनीकरणासाठी टाकलेल्या खडीने अडथळा होत आहे.
विशेष म्हणजे याच परिसरातून आसपासच्या जवळपास पाच खेड्यातील विद्यार्थी पी.डी.बडोला माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येत असतात रस्त्याच्या बाजूला पदपथावर खडीचे ढीग असल्याने पायी चालण्यासाठी अडचणी येत असून नाईलाजास्तव जीव धोक्यात घालून वाहनांचा सामना करत रस्त्यावरून चालावे लागत आहे.
तसेच रस्त्याचे डांबर पूर्णपणे निघून गेल्याने संपूर्ण रस्ता माती मुक्त झाला असून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांमुळे दिवसभर मातीचा धुराळा उडतो या मातीच्या धुरांचे लोट रस्त्याच्या बाजूला आपला व्यवसाय थाटून बसलेले व्यवसायिक तसेच रस्त्याच्या बाजूला आपली घरे बांधून राहत असलेले रहिवासी यांना त्रासदायक ठरत आहे.
म्हणून संबंधितांनी ठेकेदारांनी या तक्रारींकडे लक्ष देऊन रस्ता नूतनीकरणाचे काम जलदगतीने करावे व लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी यांनी ठेकेदारांना तश्या सुचना देऊन नूतनीकरण त्वरित करण्यास भाग पाडावे अशी मागणी जोर धरत आहे.