शेंदुर्णी येथील गरुड महाविद्यालयाच्या शिरपेचात अजुन एक मानाचे मोरपंख ! प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील यांना केप कॉमोरीन संशोधन संस्थेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार .

दिलीप जैन.( पाचोरा )
दिनांक~०८/०१/२०२१
जामनेर तालुक्यातील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी शेंदुर्णीच्या संचलीत अप्पासाहेब र. भा. गरुड महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील यांना CAPE COMORIN या दक्षिण भारतातील नामांकीत संशोधन संस्थेच्या वतीने वर्ष २०२० साठी OUTSTANDING PH.D.THESIS AWARD (उत्कृष्ट संशोधन प्रबंध) हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना त्यांच्या उत्कृष्ट पीएच. डी. प्रबंधकरिता प्राप्त झाला. हा पुरस्कार त्यांना कोव्हिड १९ च्या परिस्थितीत ऑनलाइन पध्दतीने दि.३०/१२/२०२० ला प्रदान करण्यात आला. यात त्यांना मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले.
यापुरस्कारासाठी त्यांच्या संशोधन प्रबंधातील लेखनाची मांडणी,विषयातील नावीन्य, संशोधनातील गुणवत्ता व इतर बाबींची गुणवत्ता तपासण्यात आली. त्यात त्यांना सर्वोच्च मानांकन मिळाले. या मानांकनासाठी संपूर्ण भारतातून प्रवेशिका आल्या होत्या.
या पुरस्काराच्या मानांकनासाठी व प्रबंधाच्या परिक्षणासाठी परदेशातील परीक्षक व देशातील परीक्षक होते त्यात युनायटेड किंग्डम, अलबेनिया, ट्युनिशीया व आपल्या देशातील नामवंत परीक्षकांनी प्रबंधाच्या मूल्यमापनाचे काम पाहिले.
प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील यांनी त्यांच्या पीएचडी प्रबंधात “इंग्रजी व मराठी साहित्यातील पर्यावरण जनजागृती या विषयावर नाविन्यपूर्ण मंथन केलेले आहे”. यात त्यांनी पाश्चिमात्य (अमेरिकन) साहित्यिक हेन्री डेविड थरो आणि मराठी साहित्यिक मारुती चितमपल्ली यांच्या साहित्याचा पर्यावरण जनजागृती विषयी गुणवत्तापूर्ण उहापोह केलेला आहे.
तसेच शैक्षणिक जबाबदारी संभाळत असतांना प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील हे रासेयो कार्यक्रम अधिकारी म्हणून सामाजिक पटलावर सुद्धा आपला ठसा उमटवत आहेत. त्यांनी ‘वृक्ष दत्तक योजना’, ‘रक्त दान शिबीरे’, तंबाखू मुक्त अभियान, बेटी बचाव, बेटी पढाव ई. स्वरूपाचे समाजप्रबोधनपर उपक्रम राबविले आहेत. याचाच परीपाक म्हणून त्यांना २०१८ साली डॉ.प्रकाश आमटे यांच्या हस्ते “उत्कृष्ट सामाजिक उत्तरदायित्व पुरस्कार” मिळाला व २०१९ मध्ये त्यांना तंबाखू मुक्त अभियानाबद्दल संबंध फौंडेशन दिल्लीच्या वतीने “बेस्ट लीडरशिप अँड मेंटर पुरस्कार” मिळाला.
प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील यांना मिळालेल्या यापुरस्काराबद्दल धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटीचे चेअरमन दादासाहेब संजयराव गरुड, सचिव श्री सतीशजी काशिद, सहसचिव श्री. भाऊसाहेब दिपकजी गरुड, संचालिका ताईसो. उज्ज्वला काशीद, कु.देवश्री काशीद तसेच संस्थापदाधिकारी, प्राचार्य डॉ. वासुदेव रमेश पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय आणि शिक्षकेतर बंधू भगिनी,आजी-माजी विद्यार्थ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.